
मुंबईः बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे यांची कोणतीही भूमिका नव्हती. ज्यांनी बाबरी पाडली ते कदापि शिवसैनिक नव्हते, असा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच संतप्त झाले आहेत. बाबरीच्या खंदकातून उंदीर बाहेर पडत आहेत. बाबरी पडली तेव्हा बरेच उंदीर पळाले. बाबरी शिवसैनिकांनीच पाडली. मिंधे आता चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेणार आहे की, स्वतः राजीनामा देणार आहे? असा सवाल त्यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा आयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याशी कोणताही संबंध नाही. ज्यांनी बाबरी मशीद पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते, असा दावा भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेले उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला.
… तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले
संतापजनक गोष्ट ही आहे की, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात लपून बसले होते. कुणीही बाहेर यायला तयार नव्हते. आताचे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेही नाव कुठेच नव्हते. सुंदरसिंह भंडारी यांनी अंगलट काही यायला नको म्हणून बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचाच सहभाग होता, असे जाहीर केले. ही बातमी आली तेव्हा मी स्वतः हजर होतो. बाबरी पाडल्यावर बाळासाहेबांना फोन आला होता. तेव्हा ते म्हणाले जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला अभिमान आहे. बाळासाहेबांनी फोन ठेवला आणि म्हणाले की हे कसले नपुंसक नेतृत्व आहे? असे नेतृत्व असेल तर हिंदू उभा राहणार नाही.
भाजपचे हिंदुत्व नेमके कोणते?
भाजपची मला किव येते. एका बाजूला मोहन भागवत मशिदीत जातात आणि दुसऱ्या बाजूला बाबरी पण आम्हीच पाडली म्हणून सांगत आहेत. मग नेमके काय करायचे? यांचे हिंदुत्व नेमके आहे तरी काय? जसे मी सांगतो की आमचे हिंदुत्व हे शेंडी-जाणव्यांचे हिंदुत्व नाही, तर राष्ट्रीय हिंदुत्व आहे. तसे भाजपने एकदा त्यांचे हिंदुत्व स्पष्ट करावे, असे ठाकरे म्हणाले.
हिंदूंचा इतिहासही पुसणार का?
त्यावेळी कुणी शाळेच्या सहलीला गेले होते आणि सांगतात माझ्या आजूबाजूने गोळ्या गेल्या होत्या. कोणी म्हणते या तुरूंगात होतो, कुणी म्हणतेय त्या तुरूंगात होतो. इतके दिवस गप्प का होतात? मोगलांचा इतिहास पुसता पुसता हा भरकटलेला पक्ष हिंदूंचा इतिहासही पुसणार आहेत का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. बाबरी पाडल्यानंतर मुंबईत जी दंगल उसळली त्यावेळी शिवसेनेने मुंबई आणि मराठी वाचवली, असेही ठाकरे म्हणाले.
हा बाळासाहेबांचा अपमानच
जे मिंधे आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडला म्हणून सत्तेसाठी पाय चाटत भाजपसोबत केले. आता त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा. हे जर शक्य होणार नसेल तर सत्तेसाठी लाघोटेपणा करत गेलेल्या मिंधेंनी राजीनामा द्यावा. कारण भाजपने बाळासाहेब ठाकरेंचा अपमानच केला आहे, असेही ठाकरे म्हणाले.