
नवी दिल्लीः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत २०२२ नंतर पुन्हा मोठी फूट पडली. शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दुसऱ्या मोठ्या फुटीच्या १६ जूनच्या मध्यरात्रीपासूनच सुरूवात झाली. शिवसेनेने (उबाठा) व्हीप बजावून आज दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला ९ पैकी फक्त तीनच खासदार हजर राहिल्यामुळे या फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित ६ खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल होणार हेही निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे या फूट नाट्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे १६ जूनच्या मध्यरात्री दिल्लीत दाखल होणारे पहिले बंडखोर खासदार ठरले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत होती. १४ जून रोजी शिवसेनेने (उबाठा) बोलावलेल्या बैठकीला केवळ तीनच खासदार हजर राहिले. उर्वरित सहा खासदारांनी या बैठकीला दांडी मारली आणि या चर्चेला अधिकच वेग आला.
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे ते बैठकीला दांडी मारणारे सहा खासदार होते.
आजही शिवसेनेने (उबाठा) व्हीप बजावून नवी दिल्लीत बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला हे सहाही खासदार गैरहजर होते. त्यांनी आता वेगळा गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. संसदीय पक्षाच्या आजच्या बैठकीला दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई हे तीनच खासदार उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे १६ जूनच्या मध्यरात्री खासगी जेटने दिल्लीत पोहोचले. नांदेडहून खास खासगी जेटने निघून ते दिल्लीत पहाटे दीडच्या सुमारास पोहोचले. त्यानंतर काही तासांनीच यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव हे नांदेडमधूनच निघालेल्या वेगवेगळ्या जेटने दिल्लीत पोहोचले.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे हैदराबादहून खासगी जेटने दिल्लीत दाखल झाले. त्यापाठोपाठ उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हेही दिल्लीत दाखल झाले. सर्वात शेवटी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीला पोहोचले. या सर्व खासदारांना नोएडा येथील एका अलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.
हे सगळे घडत असतानाच नवी दिल्लीला जाण्यापूर्वी जयपूरला गेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहाटे तीनच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे हे पहाटे साडेचारच्या सुमारास दिल्लीला पोहोचले, असे सूत्रांनी सांगितले.
खा. श्रीकांत शिंदे दिल्लीत दाखल झाल्यानंतर १७ जून रोजी सकाळी ७ वाजता खा. श्रीकांत शिंदे आणि खा. ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्याच दिवशी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अन्य पाच खासदारांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट घेतली आणि आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होत असल्याचे सांगत सभागृहातील बैठक व्यवस्था बदलण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी लोकसभाध्यक्षांना दिले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आपल्या मूळ विचाविचारांसापासून भरकटली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते भविष्यात शिवसेनेचे (उबाठा) काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची योजना आखत आहेत, असा दावा या सहा खासदारांच्या स्वाक्षरीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आलेल्या पत्रात करण्यात आला आहे. ही योजना समजल्यामुळेच आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यावी, असे या सहा बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
बंड फत्ते करून धरल्या वेगवेगळ्या दिशा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ‘बंडखोरी’ची ही प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे आणि त्याची कुठेही उघड वाच्यता होणार नाही, याची खबरदारी घेत पार पाडण्यात आल्या. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बंडखोर खासदार दिल्लीतून वेगवेगळ्या दिशेला रवाना झाले. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे दिल्लीहून निघून आधी चेन्नईला गेले, तिथून ते तिरूपतीला पोहोचले. यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिल्लीहून आयोध्या गाठत प्रभू रामाचे दर्शन घेतले. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर पुण्याला तर उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे मुंबईला परतले.
विविध बैठका आणि कमालीची गुप्तता
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करण्यासाठी विविध बैठका घेण्यात आल्या. पण त्याची कोणालाही खबर लागू देण्यात आली नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कुठलाही नेता ‘ऑपरेशन टायगर’बाबत उघडपणेच सोडा पण खासगीतही बोलत नव्हता. १६ जून रोजी हे ऑपरेशन प्रत्यक्षात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या, त्याबाबतही कमालीची गुप्तता पाळण्यात आली. बंडखोर खासदारांपैकी कोण, कुठून आणि कसा दिल्लीला पोहोचणार, याच्या नियोजनाबाबतही खूपच गुप्तता पाळण्यात आली.
२० जूनला विलिनीकरणाची घोषणा?
सहा बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याचा औपचारिक प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून हे सहाही खासदार २० जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीतच विलिनीकरणाची घोषणा होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
आता काय असेल शिवसेनेच पुढचे पाऊल?
शिवसेना (उबाठा) नेते अरविंद सावंत यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या सहा खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून शिवसेना (उबाठा) संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या खासदारांचे सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
