
नवी दिल्ली: सॉफ्टवेअर-कॉम्प्यूटर सायन्स, एमबीएचे शिक्षण आता कालबाह्य झाले असून कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे (एआय) रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होत असल्यामुळे तरूणांनी आता पदव्यांच्या मागे न धावता प्लम्बिंग, इलेक्ट्रिशियन, सुतारकाम यासारख्या प्रत्यक्ष मानवी कौशल्यावर लक्ष केंद्रित करावे, असा ‘महत्वपूर्ण’ सल्ला देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी देशातील तरूणांना दिला आहे.
एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्ही. अनंत नागेश्वरन म्हणाले की, एआयच्या झपाट्याने वाढत चाललेल्या प्रभावामुळे जगभरातील रोजगाराच्या बाजाराचे स्वरूप बदलत चालले आहे. देशात दिर्घकाळपर्यंत सॉफ्टवेअर, कॉम्प्यूटर सायन्स, एम.बी.ए. पदव्यांची मोठी चलती होती. पण आता तो काळ संपत चालला आहे. मात्र एआय आता अनेक पारंपरिक कामे आपल्या हातात घेऊ लागला आहे. त्यामुळे तरूणांनी आता एआय पर्याय ठरूच शकत नाही आणि जिथे मानवी संवेदना आणि वैयक्तिक संपर्क महत्वाचा असतो वेल्डर, प्लम्बिंग, सुतारकाम यासारख्या मानवी कौशल्यावर आधारित क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे, असे नागेश्वरन म्हणाले.
प्लम्बर, वेल्डर, सुतारकाम अशा ट्रेड स्कील असलेल्या व्यवसाय हे सन्मानाचे हक्कदार आहेत, पण भारतात या व्यवसायांना तो सन्मान मिळत नाही.स्वीत्झर्लंड, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया आणि चीनसारख्या देशात व्यावसायिक कौशल्य असलेल्या लोकांना प्रचंड सन्मान दिला जातो. भारतात मात्र कष्टाच्या कामांना दुय्यम नजरेने पाहिले जाते. या मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे. भारताने या मानसिकतेत बदल केला तरच देशातील तरूण करिअर म्हणून हे व्यवसाय स्वीकारायला तयार होतील, असेही नागेश्वरन म्हणाले.
वृद्धांची देखभाल, विशेष आवश्यकता असलेल्या मुलांचे काऊंसिलिंग, रूग्णालयातील सहायक सेवा, क्रीडा शिक्षण, पाककला अशा मानवी स्पर्श असलेल्या सेवांची जागा घेणे एआयला शक्य होणार नाही. त्यामुळेच भविष्यात या क्षेत्रातील प्रशिक्षित व योग्य व्यक्तीची मागणी वाढू शकते, असे नागेश्वरन म्हणाले. भारतासमोर केवळ बेरोजगारी हेच आव्हान नाही तर रोजगारयोग्यता म्हणजेच लोकांना काम करण्यायोग्य बनवणेही तेवढेच मोठे आव्हान आहे. केवळ नोकऱ्या निर्माण करून चालणार नाही, तर तरूणांना त्या रोजगारासाठी आवश्यक कोशल्यही शिकवावे लागेल, असे नागेश्वरन म्हणाले.
