
छत्रपती संभाजीनगरः नीट पेपरफुटीसह देशातील विविध स्पर्धा परीक्षांतील घोटाळ्यांमुळे देशभरातील वातावरण तापले असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापक भरतीसाठी घेतलेल्या ऑनलाइन पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेतही महाघोटाळा झाल्याचे सज्जड पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले असून या परीक्षेत अर्ध्या गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असताना प्रत्यक्षात उमेदवारांना भलतेच गुण देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यामुळे या परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर आणि धाराशिव उपपरिसरातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये ३२ हजार रुपये प्रतिमहिना एकत्रित वेतनावर ११ महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण १४१ कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या नियुक्ती करिता अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज केलेल्या उमेदवारांची ३ व ४ ऑगस्ट २०२६ रोजी संगणकआधारित ऑनलाईन पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात आली होती. कंत्राटी तत्वावरील सहायक प्राध्यापकांच्या १४१ जागांसाठी ४६८ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३९२ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ५ ऑगस्ट रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि पात्र उमेदवारांच्या १० ते १३ ऑगस्टदरम्यान मुलाखती घेण्यात येतील, असे विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
विद्यापीठाने जाहीर केलेल्या संगणकआधारित ऑनलाईन पात्रता परीक्षेच्या (टीईटी) निकषांनुसार एकूण ८० गुणांची ही ऑनलाइन परीक्षेत एकूण ८० गुणांसाठी ८० बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) ठेवण्यात आले होते आणि प्रत्येक योग्य उत्तरासाठी १ गुण दिला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. या परीक्षेसाठी ९० मिनिटे कालावधी देण्यात आला होता.
या परीक्षेत नकारात्मक गुण पद्धती म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आली होती आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५ म्हणजेच अर्धा गुण वजा केला जाईल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले होते. परंतु विद्यापीठ प्रशासनाने जेव्हा या परीक्षेचा निकाल जाहीर केला तेव्हा या परीक्षेच्या निकालात निगेटिव्ह मार्किंग वजा करून उर्वरित गुणांची गोळाबेरीज करून निकाल लावताना घोळ घालून महाघोटाळा करण्यात आल्याची धक्कादायक बाब न्यूजटाऊनच्या पडताळणीत उघडकीस आली आहे.

अर्ध्या गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असतानाही अनेक उमेदवारांना ७३.२५, ६५.२५, ५५.७५, ४५.२५ आणि ३५.७५ असे गुण मिळाल्याचे विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालपत्रावरून स्पष्ट झाले आहे. जर अर्ध्या मार्काचे निगेटिव्ह मार्किंग होते तर उमेदवारांना .२५ किंवा .७५ गुण मिळालेच कसे? ही गुणांची गोळाबेरीजच या परीक्षेच्या निकालातील घोटाळ्यावर लख्ख प्रकाश टाकणारी आहे.
असा समजून घ्या निकालातील घोटाळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कंत्राटी सहायक प्राध्यापक भरतीसाठी घेतलेल्या टीईटी परीक्षेच्या निकालात घोटाळा कसा झाला? ‘फिजिक्सच्या कुलगुरूं’चे कॅल्क्युलेटर कसे हुकले? हे दोन उदाहरणासह समजून घेऊ या.
पहिले उदाहरण- समजा एका उमेदवाराने ८० गुणांच्या या परीक्षेत ६५ प्रश्नांची उत्तरे योग्य लिहिली आणि ५ प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिली आहेत तर त्याने दिलेल्या योग्य उत्तरासाठी प्रत्येकी १ गुण याप्रमाणे त्याला एकूण ६५ गुण मिळतील आणि त्याने चुकीच्या लिहिल्या ५ प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रत्येक प्रश्नासाठी अर्धा गुण याप्रमाणे एकूण २.५ गुण त्याला मिळालेल्या एकूण ६५ गुणांमधून वजा होतील. म्हणजेच त्या उमेदवाराला प्रत्यक्ष मिळालेले गुण ६२.५ येतील.
दुसरे एक उदाहरण- समजा एका उमेदवाराने या परीक्षेत ८० प्रश्नांपैकी ७० प्रश्नांची योग्य उत्तरे दिली आणि ४ प्रश्नांची उत्तरे चुकीची लिहिली. तर त्या उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक योग्य उत्तरासाठी त्याला ७० गुण दिले जातील आणि या गुणांतून त्याने चुकीच्या लिहिलेल्या ४ प्रश्नांसाठी प्रत्येक प्रश्नासाठी ०.५ गुण म्हणजे २ गुण वजा केले जातील आणि त्या उमेदवाराला मिळालेले प्रत्यक्ष गुण ६८ येतील.
उमेदवाराने लिहिलेल्या योग्य उत्तरांची किंवा चुकीच्या उत्तरांची संख्या सम किंवा विषम असली तरीही मिळणारे एकूण गुण हे एक तर पूर्ण संख्या असतील किंवा त्याला मिळालेले गुण हे पूर्णांक संख्येसह दशांश ५ (.५) असेच असतील ते दशांश ७५ (.७५) किंवा दशांश २५ (.२५) असे जगातील कोणत्याही कॅल्क्युलेटरवर मोजले तरीही येणार नाहीत, सूर्यप्रकाशाईतके स्पष्ट आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने याआधी घेतेलेल्या पीएचडी प्रवेशासाठीच्या पेट परीक्षेत मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याचे आरोप करत अनेक उमेदवारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रलंबित असतानाच आता विद्यापीठाने घेतलेल्या कंत्राटी प्राध्यापक भरतीच्या टीईटी परीक्षेतही निगेटिव्ह मार्किंगची गोळाबेरीज करून निकाल लावताना महाघोटाळा केल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे या परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

भरती एकच, मग निकष वेगवेगळे का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ११ महिने कालावधीसाठी ३२ हजार रुपये एकत्रित वेतनावर भरावयाच्या कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या नियुक्ती प्रक्रियेतही वेगवेगळ्या निकषांचा अवलंब करून ‘एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय’ असा भेदभावमूलक पवित्रा घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. विद्यापीठ प्रशासनाने एकीकडे मुख्य परिसर आणि धाराशिव उपपरिसरातील विविध शैक्षणिक विभागातील १४१ कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या भरतीसाठी टीईटी परीक्षेची चाळणी लावली असताना दुसरीकडे कंत्राटी तत्वावरीलच अन्य २९ सहायक प्राध्यापकपदाच्या भरतीसाठी टाईटीची ‘चाळणी’ वगळून थेट मुलाखती (वॉक-इन-इंटरिव्ह्यू) ठेवण्यात आले आहेत.
टीईटीशिवाय कंत्राटी तत्वावर भरण्यात येणाऱ्या या सहायक प्राध्यापकांमध्ये पैठणच्या संतपीठातील ८, घनसावंगीच्या मॉडेल कॉलेजमधील ९ आणि गोपीनाथराव मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड रिसर्चमधील (जीएमएनआआरडी) १२ कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या पदांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे ज्या कंत्राटी सहायक प्राध्यापकपदाच्या भरतीसाठी विद्यापीठाने टीईटी परीक्षा आणि मुलाखती अशी चाळणी लावली, ती १४१ पदे आणि टीईटी परीक्षेशिवाय फक्त थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येत असलेली २९ पदे यांचा कालावधी, एकत्रित वेतन सारखेच असताना केवळ या २९ पदांनाच टीईटी परीक्षेच्या चाळणीतून का वगळले? सारख्याच कालावधीसाठी आणि सारख्याच एकत्रित वेतनावरील पदांच्या भरतीसाठी असे भेदभावमूलक निकष का? असा सवाल केला जात आहे.
