औरंगाबाद शहराबरोबच आता जिल्हा आणि विभागाचेही ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतर, उस्मानाबाद तालुका-जिल्ह्याचेही नाव बदलले!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा निर्णय न्यायप्रविष्ठ असतानाच राज्य सरकारने आता औरंगाबाद शहराबरोबरच औरंगाबाद जिल्हा आणि औरंगाबाद विभागाचेही छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केले आहे. उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्याचे नामांतरही धाराशिव करण्यात आले आहे. काल १५ सप्टेंबर रोजी राजपत्रात याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज शनिवारी छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीच्या एक दिवस आधीच म्हणजे काल शुक्रवारी (१५ सप्टेंबर) रोजी राज्य सरकारने राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून औरंगाबाद शहराबरोबरच जिल्हा आणि विभागाचेही नामांतर छत्रपती संभाजीनगर असे केले आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचे नावही धाराशिव जिल्हा असे केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद तालुका, औरंगाबाद उपविभाग आणि औरंगाबाद विभागाचे नाव बदलण्यात आले नव्हते. उस्मानाबादच्या बाबतीतही असाच निर्णय झाला होता. मात्र आता राज्य सरकारने राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून हे सर्व बदल केले आहेत.

राज्य सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार औरंगाबाद शहर जसे छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखले जाईल तसेच औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, औरंगाबाद तालुका छत्रपती संभाजीनगर तालुका, औरंगाबाद उपविभाग छत्रपती संभाजीनगर उपविभाग आणि औरंगाबाद विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणून ओळखला जाईल.

या आधी फक्त उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव करण्यात आले होते. या अधिसूचनेनुसार आता उस्मानाबाद तालुका धाराशिव तालुका, उस्मानाबाद उपविभाग धाराशिव उपविभाग आणि उस्मानाबाद जिल्हा धाराशिव जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे.

औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर निर्णय येणे बाकी आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत शासकीय कामकाजात छत्रपती संभाजीनगर हे नाव वापरले जाणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आले आहे.

औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे लेखी आदेश जारी करून न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत सर्व शासकीय कार्यालयांना छत्रपती संभाजीनगरऐवजी औरंगाबाद हेच नाव वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. तरीही अनेक शासकीय कार्यालयांकडून सर्रासपणे छत्रपती संभाजीनगर असे नाव वापरण्यात येत आहे. आता राज्य सरकारने तालुका, जिल्हा आणि विभागाचेही नामांतर करणारी अधिसूचना जारी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!