मुख्यमंत्र्यांनी ‘फाईव्ह स्टार’ हॉटेलमधील मुक्काम सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर हलवला!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) आज शनिवारी होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शहरात दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा फाईव्ह स्टार हॉटेलमधील शासकीय विश्रामगृहावर हलवला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात होत असलेल्या या मंत्रिमंडळ बैठकीच्या फाईव्ह स्टार थाटावरून विरोधी पक्षाने सरकारवर टिकेची झोड उठवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

मंत्रिमंडळ बैठकीसाठी मराठवाड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह संपूर्ण मंत्रिमंडळ अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह दाखल झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राहण्याची सोय रामा इंटरनॅशनल या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांसाठी या हॉटेलमध्ये बुक करण्यात आलेल्या सूटचे भाडे दिवसाला ३२ हजार रुपये आहे. याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्र्यांच्या राहण्यासाठी ३० सूट बुक करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीचा हा फाईव्ह स्टार थाट टिकेचे लक्ष्य बनला होता.

सचिवांना राहण्यासाठी हॉटेल ताजमध्ये ४० रुम बुक करण्यात आल्या आहेत. हॉटेल अजंता ऍम्बेसिडरमध्ये उपसचिव आणि खासगी सचिवांना राहण्यासाठी ४० रुम बुक करण्यात आल्या आहेत. अमरप्रित हॉटेलमध्ये ७० रुम बुक करण्यात आल्या असून तेथे उपसचिव, खासगी सचिव आणि कक्ष अधिकारी थांबणार आहेत. नम्रता केटरर्सला जेवणाचे कंत्राट देण्यात आले असून एका थाळीची किंमत एक हजार ते दीड हजार रुपय आहे.

छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या या फाईव्ह स्टार थाटावरून विरोधी पक्षांनी सरकारवर टिकास्त्र सोडले होते. मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे. यंदा राज्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून मराठवाड्यावर दुष्काळाचे भीषण संकट आवासून उभे आहे. एका बाजूला मराठवाडा दुष्काळाच्या खाईत असताना मंत्रिमंडळ बैठकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची गरजच काय? असा सवाल करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विरोधकांच्या टिकेचे बोचरे बाण या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाईव्ह स्टार हॉटेलमधील आपला मुक्काम सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर हलवला. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) मंत्रिमंडळाच्या अनेक बैठका झाल्या. या बैठकीसाठी आलेले तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनोहर जोशी, अशोक चव्हाण इत्यादींनी सुभेदारी शासकीय विश्रामगृहावरच मुक्काम केला होता. विरोधकांनी ही आठवण देत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला मुक्काम हलवल्याचे सांगितले जाते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!