
नागपूरः नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरतीय केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी बोर्ड) छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जमादार नागपूर पोलिसांच्या रडारवर असून पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावूनही त्यांनी छत्रपती संभाजीनगर विभागात परीक्षा सुरू असल्यामुळे चौकशीला जाणे टाळल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत २०१९ पासून सुमारे ५८० प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे आदेश तसेच शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशांची कोणतीही शहानिशा न करता बनावट शालार्थ आयडी प्रदान करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.
या घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले नागपूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या आधी एसएससी बोर्डाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या विद्यमान सचिव वैशाली जमादार या नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक होत्या. एका तक्रारीच्या अनुषंगाने नागपूरच्या सदर पोलिसांनी वैशाली जमादार यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
‘छत्रपती संभाजीनगर विभागात सध्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे माझे चौकशीला हजर राहणे जमणार नाही,’ असे कारण देत वैशाली जमादार यांनी चौकशीला हजर राहणे शक्य नसल्याचे पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांचे पथक स्वतःच छत्रपती संभाजीनगरात येऊन वैशाली जमादार यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात पोलिस दररोज वेगवेगळ्या लोकांची चौकशी करत आहेत. त्यात आता वैशाली जमादार यांचाही नंबर लागला असून नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक असताना त्यांनी बजावलेल्या भूमिकेची कसून चौकशी केली जाणार आहे.
सायबर कॅफेत तयार झाले ६८ बनावट प्रस्ताव
नागपूरच्या सदर भागात असलेल्या एका सायबर कॅफेत शिक्षक भरतीचे ६८ बनावट प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यापैकी १३ जणांना २०१६ ते २०२४ या कालावधीत भंडारा, गोंदिया जिल्ह्यात नोकऱ्याही मिळाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हे शिक्षक सध्या शाळांमध्ये कार्यरत आहेत की नाहीत, याची पोलिस चौकशी करत आहेत.
बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक करण्यात आलेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला अर्जुनी मोरगाव येथील शिक्षक महेंद्र भाऊराव म्हैसकर याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती सांगितली आहे. महेंद्रनेच सदर भागातील एका सायबर कॅफेत बसून ६८ शिक्षकांचे बनावट प्रस्ताव तयार केले. पोलिसांनी सायबर कॅफेतील कॉम्प्युटरची तपासणी केली असता हे ६८ प्रस्ताव आढळून आले आहेत.
पोलिसांनी महेंद्र म्हैसकरच्या आवळेनगर येथील निवासस्थानी छापा टाकून ५३ उमदेवरांची कागदपत्रे आणि २२ शिक्षकांचे बनावट प्रस्ताव जप्त केले आहेत. सायबर कॅफेतील प्रस्ताव आणि घरी आढळलेले प्रस्ताव याची गोळाबेरीज केली तर महेंद्र म्हैसकरने तयार केलेल्या बनावट प्रस्तावांची संख्या १४३ च्या घरात जाते. तपासादरम्यान हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

