बोगस कागदपत्रांअधारे मान्यता दिल्याप्रकरणी नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांप्रमाणे छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण उपसंचालकांवरही कारवाई?


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदाची वैयक्तिक मान्यता दिल्याप्रकरणी नागपूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना पोलिसांनी अटक केली आहे. नरड यांच्याप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय शिक्षण उपसंचालकांनी बनावट आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे एका व्यक्तीस अंशतः अनुदानित पूर्णवेळ सहशिक्षकपदावर वैयक्तिक मान्यता दिलेली असल्यामुळे नागपूरप्रमाणेच आता छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांवरही कारवाई होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे.

पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसतानाही तसेच त्याने शिक्षक म्हणून कोठेही काम केलेले नसतानाही त्याला भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील जेवताळा येथील नानाजी पुडके विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदाची वैयक्तिक मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी पराग नानाजी पुडके याने नागपूरच्या यादवनगरातील एस.के.बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिराची बोगस व बनावट कागदपत्रे तयार केली.

 याच बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून पराग पुडके याला थेट मुख्याध्यापकपदाची वैयक्तिक मान्यता दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात उल्हास नरड याला शुक्रवारी रात्री गडचिरोलीतून अटक करण्यात आली.

हेही वाचाः उच्च शिक्षणमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये बोगस प्रवेश दाखवून तयार केल्या शिवाजी विद्यापीठाच्या बनावट पदव्या आणि कोहिनूर महाविद्यालयात मिळवली नोकरी!

बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदाची वैयक्तिक मान्यता दिल्याप्रकरणी नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांना बेड्या ठोकण्यात आल्यामुळे राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडालेली असतानाच आता छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय शिक्षण उपसंचालकांवरील कारवाईकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनीही बोगस आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे अंशतः अनुदानित पूर्णवेळ सहशिक्षकपदावर एका व्यक्तीस मान्यता देण्यात आली आहे. याप्रकरणी रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे.

हेही वाचाः आणखी एक ‘चारसौ बीसी’: ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान  यांची डीवाय पाटील विद्यापीठाची एमफिल पदवीही बोगस!

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव आणि राज्याच्या शिक्षण आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनुसार, मोहम्मद हफीझ उर रहमान मोहम्मद मोइजुद्दिन (रा. एन-११ एलसी-३८, यादवनगर, हडको कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर) या उमेदवाराने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून बी.ए. प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र, एम.ए. प्रथम व द्वितीय वर्षाच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र तसेच बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षाच्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र असे बनावट व खोटे दस्तावेज तयार करून खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या अशासकीय अनुदानित संस्थेत संस्थेचे अध्यक्ष, सचिव व निवड समिती सदस्यांशी संगनमत करून २३ सप्टेंबर २०२४ रोजी मराठी व मानसशास्त्र विषयाच्या अंशतः अनुदानित पूर्णवेळ सहशिक्षकपदावर नियुक्ती मिळवली.

हेही वाचाः डीपीयूच्या बोगस एमफिलवरच ‘पेट’ला कट मारून आस्मा व मकसूद खानने घेतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठात पीएचडीला प्रवेश!

बनावट व खोट्या गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्राच्या आधारे मिळवलेल्या या नियुक्तीला छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी कागदपत्रांची कोणतीही पडताळणी न करताच १५ ऑक्टोबर २०२४ रोजी वैयक्तिक मान्यता दिली आणि सदर सहशिक्षकाचे नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्याची प्रक्रियाही सुरू केली.

मोहम्मद हफीझ उर रहमान मोहम्मद मोइजुद्दिन याच्याकडे असलेली शिवाजी विद्यापीठाची बी.ए., एम. ए. आणि बी.एड.च्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रे बनावट व खोटी असल्याचे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांना ५ एप्रिल २०२५ रोजीच्या पत्रान्वये कळवले. तसेच ज्या महाविद्यालयात मोहम्मद हफीझ उर रहमान मोहम्मद मोइजुद्दिनने प्रवेश दाखवला होता, त्या महाविद्यालयांनीही या विद्यार्थ्याचा आमच्याकडे प्रवेशच नव्हता आणि त्याच्याकडील गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे बनावट असल्याचेही लेखी कळवले आहे.

हेही वाचाः ‘कोहिनूर’च्या सचिव डॉ. आस्मा खान आणि सहसचिव मकसूद खानविरुद्ध बेगमपुरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल, पीएचडीचे प्रवेशही रद्द करणार

मोहम्मद हफीझ उर रहमान मोहम्मद मोइजुद्दिन याने कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि निवड समितीतील सदस्यांशी संगनमत करून आणि शासनाची फसवणूक करून अंशतः अनुदानित पूर्णवेळ सहशिक्षकपदावर नियुक्ती तसेच मान्यता मिळवल्याचे संबधित प्राधिकाऱ्यांच्या पत्रव्यवहारावरून स्पष्ट झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांनी सर्व संवंधितांविरुद्ध तातडीने पोलिसांत फिर्याद देऊन कायदेशीर कारवाई करणे बंधनकारक होते. परंतु तसे झाले नाही.

हेही वाचाः बोगस एमफिल पदवीच्या आधारे पीएचडीला प्रवेश मिळवल्याप्रकरणी ‘कोहिनूर’च्या सचिव आस्मा खान गजाआड; रमजान ईद पोलिस कोठडीतच!

हेही वाचाः बोगस एमफिलवर बायको-भावाच्या पीएचडी प्रवेशप्रकरणी ‘कोहिनूर’चा अध्यक्ष डॉ. मझहर खान गजाआड, तरीही विद्यापीठात पाठराखण करणारा ‘विष्णू’आका कोण?

 सर्व स्पष्ट पुरावे असूनही छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक हे मोहम्मद हफीझ उर रहमान मोहम्मद मोइजुद्दिन आणि त्याच्याशी संगमनत करून शासनाची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या कार्यपद्धतीवरच गंभीर शंका येऊ लागल्या असून शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीला ते पाठीशी घालत असल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागराज गायकवाड यांनी केली आहे. आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव व शिक्षण आयुक्त नागपूरप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांवरही कारवाई करतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!