यंदा मान्सून दमदार बरसणार, जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या १०३ टक्के पाऊस; स्कायमेटचा अंदाज


नवी दिल्लीः देशात यंदा दमदार मान्सून बरसणार असून यंदाचा मान्सूचा हंगाम सामान्य राहील. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात ८६८.८ मीलीमीटर म्हणजेच सरासरीच्या १०३ टक्के पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेट या हवामानविषयक अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेने वर्तवला आहे.

स्कायमेटने आज आपला यंदाचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला. या अंदाजात मान्सूनवर विपरित परिणाम करणाऱ्या एल निनोची शक्यता नाकारण्यात आली असून यंदाच्या मान्सूनमध्ये ला निनो कमजोर असेल, असे स्कायमेटचे जतीन सिंह यांनी म्हटले आहे.

ला निनो कमकुवत असल्यास आणि एल निनोचा प्रभाव नसेल तर मान्सूनचा पाऊस जोरदार बरसत असतो. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असेही स्कायमेटने म्हटले आहे. पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा तर पश्चिम घाटात म्हणजेच प्रामुख्याने केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल. उत्तरेकडील राज्ये आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यताही स्कायमेटने वर्तवली आहे.

जूनमध्ये देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के म्हणजेच १६५.३ मीमी, जुलैमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या १०२ टक्के म्हणजेच २८०.५ मीमी, ऑगस्टमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या १०८ टक्के म्हणजेच २५४.९ मीमी आणि सप्टेंबरमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या १०४ टक्के म्हणजेच १६७.९ मीमी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी म्हटले आहे.

स्कायमेट या खासगी संस्थेने यंदाचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला असला तरी भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) २०२५ मधील मान्सूनचे पुर्वानुमान अद्याप जाहीर केलेले नाही. परंतु यावर्षी एल निनोची स्थिती ‘न्यूट्रल’ रहाण्याची शक्यता असल्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे मान्सून सामान्य रहाण्याची शक्यता आहे. मान्सूनची सुरूवात आणि मान्सूनच्या प्रगतीबाबत आताच काही सांगणे घाईचे ठरेल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!