
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठाच्या बोगस एम.फिल. पदवीच्या आधारे पेट परीक्षेतून सूट मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची फसवणूक करून बायको आणि भावाला पीएच.डी.ला प्रवेश मिळवून दिल्याप्रकरणी कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान याला रविवारी पहाटे बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी डॉ. मझहर खानची बायको आस्मा इद्रिस खान हिला आधीच अटक केली असून या प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि मझहरचा भाऊ मकसूद खान अद्यापही फरार आहे.
पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून एम.फिल.ची बनावट आणि खोटी पदवी तयार करून कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान याची पत्नी व कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव डॉ. आस्मा इद्रिस खान आणि मझहरचा भाऊ तथा कोहिनूर शिक्षण संस्थेचा सहसचिव पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान या दोघांनी २०२१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट परीक्षेतून सूट मिळवून पीएच.डी.ला प्रवेश मिळवला होता.
आस्मा खान आणि मकसूद खान हे आमच्या विद्यापीठाचे कधीही विद्यार्थी नव्हते आणि नाहीत. तसेच आमच्या विद्यापीठात कोणत्याही विषयाचा एम.फिल.चा अभ्यासक्रमच चालवला जात नाही, त्यामुळे आस्मा इद्रिस खान आणि पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान या दोघांकडे असलेली अनुक्रमे इंग्रजी व हिंदी विषयातील एम.फिल.ची पदवी बनावट आणि खोटी आहे, असा स्वयंस्पष्ट लेखी खुलासा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील पीएच.डी. विभागाचे उपकुलसचिव विजय मोरे यांनी २६ मार्च रोजी बेगमपुरा पोलिसांत बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती. मोरे यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१८(५), ३३६ (३), ३४० (२) आणि ३ (५) अन्वये २६ मार्च रोजीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी तपास अधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांनी चौकशी करून कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव आस्मा इद्रिस खान हिला ३० मार्च रोजी अटक केली होती. आस्मा खान सध्या न्यायालयीन कोठडीत असून पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान हा अद्यापही फरार आहे.
कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष डॉ. मझहर खान हा या बनावट पदव्या तयार करण्याच्या गुन्ह्यातील मास्टर माइंड असल्याचे धागेदोरे हाती लागल्यानंतर बेगमपुरा पोलिसांनी डॉ. मझहर खानला रविवारी पहाटे फुलंब्री तालुक्यातील बडोद बाजार परिसरातील महाल किन्होळा या त्याच्या गावातून अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ या पुण्यातील नामांकित खासगी विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून आस्मा इद्रिस खानने इंग्रजी विषयातील तर पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान याने हिंदी विषयातील एम.फिल. पदवीच्या बनावट व खोट्या गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्र तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २०२१च्या पेट परीक्षेतून सूट मिळवून पीएच.डी.ला प्रवेश मिळवला होता. या दोघांनीही बनावट व खोट्या एम.फिल.च्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याची तक्रार रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने कळवल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बेगमपुरा पोलिसांत फिर्याद दिली होती.
विद्यापीठात पाठराखण करणारा ‘विष्णू आका’ कोण?
बनावट व खोट्या एम.फिल. पदवीच्या आधारे फसवणूक करून आस्मा इद्रिस खान आणि पठाण मकसूद खान पठाण अन्वर खान या दोघांनी पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २६ मार्च रोजी बेगमपुरा पोलिसांत फिर्याद दिली. विद्यापीठाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याच दिवशी गुन्हाही दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोघांचेही पीएच.डी.चे प्रवेश तातडीने रद्द करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती २६ मार्च रोजीच विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. त्याला आजघडीला तब्बल १३ दिवस उलटून गेले तरी या दोघांचेही पीएच.डी.चे प्रवेश रद्द झालेले नाहीत.
विशेष म्हणजे कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आवश्यक पायाभूत सुविधा आणि मान्यताप्राप्त अध्यापकच नसल्याचा अहवाल विद्यापीठाच्याच चौकशी समितीने दिलेला असूनही या महाविद्यालयाला पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेचे परीक्षा केंद्रही देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठात ‘कोहिनूर’ आणि डॉ. मझहर खान याची पाठराखण करणारा ‘विष्णू’आका कोण? असा सवाल केला जात आहे. हा ‘आका’ आणि मझहर खानचे व्यावसायिक हितसंबंध असल्याची माहितीही न्यूजटाऊनकडे आहे.

