मुंबईः शिवसेनेच्या ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर ही यादी पोस्ट करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत.
विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना नेमक्या किती जागा लढवणार हे अद्याप अस्पष्ट आहे. याआधी काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने १७ उमेदवार जाहीर केले आहेत.
ठाकरे गटाचे १७ उमेदवार असे
- हिंगोलीः नागेश पाटील आष्टीकर
- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): चंद्रकांत खैरे
- धाराशिव (उस्मानाबाद): ओमराजे निंबाळकर
- परभणीः संजय जाधव
- बुलढाणाः नरेंद्र खेडकर
- यवतमाळ-वाशिमः संजय देशमुख
- मावळः संजोग वाघोरे पाटील
- सांगलीः चंद्रहार पाटील
- शिर्डीः भाऊसाहेब वाघचौरे
- नाशिकः राजाभाऊ वाजे
- रायगडः अनंतर गिते
- सिंधुदुर्ग-रत्नागिरीः विनायक राऊत
- ठाणेः राजन विचारे
- मुंबई दक्षिण-मध्यः अनिल देसाई
- मुंबई ईशान्यः संजय दिना पाटील
- मुंबई दक्षिणः अरविंद सावंत
- मुंबई वायव्यः अमोल किर्तीकर
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाची उमेदवार यादी जाहीर होईल, असे मंगळवारीच सांगितले होते. त्यानुसार आज १७ उमेदवार जाहीर केले आहेत. हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही यादी जाहीर करण्यात येत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
कल्याणमधून कोण?
शिवसेना ठाकरे गटाकडून आणखी चार ते पाच उमेदवारांची नावे जाहीर करणे बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या निर्णयानंतर या उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. शिवसेनेने कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचीही घोषणा केलेली नाही. या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना महायुतीकडून उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे कल्याणमधून ठाकरेंचा उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता लागलेली आहे.