छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): येथील शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय कार्यालयातच ठिय्या मारून बसले आहेत तर मुलींच्या वसतिगृहाचे अधीक्षक येत्या ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या दोन्ही वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. विशेष म्हणजे महाविद्यालय प्रशासनाने सहसंचालक कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या अधीक्षकाला परत पाठवण्याची विनंती वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) किलेअर्क परिसरात शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी दोन स्वतंत्र वसतिगृहे आहेत. मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक अशोक कुलकर्णी हे फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून विभागीय सहसंचालक कार्यालयात डेप्युटेशनवर गेले आहेत. गेल्या बारा-तेरा महिन्यांपासून कुलकर्णी हे सहसंचालक कार्यालयातच ठाण मांडून बसले आहेत.
अधीक्षक कुलकर्णी हे सहसंचालक कार्यालयात ठाण मांडून बसल्यामुळे मुलांच्या वसतिगृहात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे त्यांना तातडीने परत पाठवण्यात यावे, असे पत्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सहसंचालक आणि राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांना पाठवले आहे. हे विनंती पत्र पाठवून अनेक महिने उलटून गेले तरी त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
सुमारे दहा महिन्यांपूर्वी मुलांच्या वसितगृहातील विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. ही घटना कळल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे पालक महाविद्यालयात आले. त्यांनी प्राचार्यांची भेट घेऊन वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि पोलिसांत या मारहाणीची तक्रार करण्याची विनंती केली. परंतु त्यांची ती विनंती धुडकावून लावण्यात आल्यामुळे शेवटी ते पालक त्या विद्यार्थ्याची टीसी काढून घेऊन गेले.
या महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहातच आयएएस परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. या प्रशिक्षणासाठी आलेले विद्यार्थी हे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केले म्हणजेच वयाने मोठे आहेत तर या महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आकरावी-बारावीपासून ते अंडर ग्रॅज्युएटचे म्हणजे वयाने लहान असल्यामुळे आयएएस परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी आलेले विद्यार्थी त्यांच्यावर दादागिरी करतात. त्यांना तुच्छतेची वागणूक देतात. महिनाभरापूर्वी या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटनाही घडली होती.
मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक कुलकर्णी हे सहसंचालक कार्यालयात उसनवारीवर गेल्यामुळे त्यांचा पदभार फुटाणे नावाच्या प्राध्यापकाकडे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे वसतिगृह अधीक्षक हे पद तृतीय श्रेणीचे तर सहयोगीप्राध्यापक/ प्राध्यापक हे पद प्रथम श्रेणीचे आहे. विभागीय सहसंचालकांची मर्जी असल्यामुळे एका तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे लाड पुरवण्यासाठी प्रथम श्रेणीच्या प्राध्यापकाकडे हा पदभार देऊन त्याचे अवमूल्यन करण्यापर्यंत महाविद्यालय प्रशासनाची मजल गेली आहे.
मुलींच्या वसतिगृहाचे अधीक्षक जी.एम. घोडे हे नियत वयोमानानुसार येत्या ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची सेवा आता अवघी चारच दिवस राहिली आहे. त्यामुळे मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक सहसंचालक कार्यालयातच आणखी ठाण मांडून बसले आणि मुलींच्या वसतिगृहाचे अधीक्षक चार दिवसांनंतर सेवानिवृत्त झाले तर या वसतिगृहांमध्ये रहाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या जबाबदारी कोणी स्वीकारायची? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नियमानुसार वसतिगृहाचे अधीक्षकपद निवासी आहे. वसतिगृह अधीक्षकांनी वसतिगृहाच्या परिसरात असलेल्या निवासस्थानीच राहणे बंधनकारक आहे. परंतु या महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे अधीक्षक तेथे रहातच नाहीत, अशी माहितीही समोर आली आहे.
वसतिगृहात अनेक समस्या
शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालायाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. सगळ्यात गंभीर समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. या विद्यार्थ्यांना रानोमाळ फिरून बाटल्या भरून पाणी आणावे लागते. वसतिगृहात राहणारे विद्यार्थी हे बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील असल्यामुळे त्यांना दररोज पाणी विकत घेण्यावर पैसे खर्च करणे परवडत नाही आणि महाविद्यालय प्रशासन त्यांना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत नाही.
दुसरीकडे साफसफाईचाही प्रश्न आहे. महाविद्यालय परिसरात अनेक अतिक्रमणे झालेली असल्यामुळे बाहेरच्या लोकांचा या परिसरात रात्रंदिवस राबता असतो. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे हेतुतः दुर्लक्ष तर केले जात नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबईतील ‘त्या’ घटनेपासून तरी धडा घेणार का?
जून २०२३ मध्ये मुंबईच्या चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहातील एका १९ वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला होता आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वच वसतिगृहाचे सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन सहसंचालकांनी काही वसतिगृहांना भेटी देऊन पाहणी केली होती. किमान त्या घटनेपासून तरी धडा घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षेकडे लक्ष देणार की नाही? असा सवाल विद्यार्थी विचारू लागले आहेत.