दहा दिवस उलटले तरी प्रा. अशोक बंडगर पोलिसांना सापडेना; अटकपूर्व जामिनाच्या खटाटोपावर आज सुनावणी


छत्रपती संभाजीनगरः विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील निलंबित प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर हा गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटले तरी पोलिसांना सापडलेला नाही. तो अद्याप फरारच असला तरी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून आज त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

वंशाचा दिवा हवा म्हणून मुलगाच हवा या वेडाने झपाटलेल्या प्रा. डॉ. अशोक बंडगरच्या विरोधात त्याच्या पत्नीसह २५ एप्रिल रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६(न), १०९, ११४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बंडगर त्याची पत्नी आणि दोन मुलींसह फरार झाला. तेव्हापासून तो ‘फरार’च आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

बंडगर फरार असला आणि पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नसला तरी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बंडगरचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. बंडगरविरुद्ध दाखल करण्यात आलेली कलमे पाहता त्याला अटकपूर्व जामीन मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे.

बंडगरविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या कलम ३७६(न) म्हणजेच एकाच महिलेवर वारंवार बलात्कारासाठी दहा वर्षांपेक्षा कमी नसेल, परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल अशी म्हणजे त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित भागासाठी सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.

विद्यापीठ प्रशासन बंडगरला सेवामुक्त करणार का?

प्रा. अशोक बंडगरविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने त्याला २६ एप्रिल रोजी मध्यान्हानंतर तडकाफडकी निलंबित केले आहे.  परंतु निलंबन आदेश जारी झाल्याच्या क्षणापासूनच अशोक बंडगरने विद्यापीठाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.

निलंबन आदेशातील अट क्रमांक ३ मध्ये आपल्याला निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा देय राहणार नाही आणि अट क्रमांक ४ मध्ये आपल्याला सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे म्हटले आहे. बंडगरने या दोन्ही अटींचे उल्लंघन केले आहे.

परंतु हा आदेश जारी झाल्यापासूनच बंडगर बेपत्ता असून मुख्यालय सोडताना म्हणजेच फरार होण्यापूर्वी त्याने सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगीही घेतलेली नाही. त्यामुळे निलंबन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विद्यापीठ प्रशासन त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करणार का?, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. निलंबन आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे बंडगरला बडतर्फ करा, अशी मागणी रिपाइंचे(आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आता कुलगरू यावर काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!