महाविकास आघाडीला धक्का, वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले ८ उमेदवार; मराठा, ओबीसींशी संधान बांधून लढणार लोकसभा!


अकोलाः वंचित बहुजन आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ओबीसी महासंघाशी युती करून वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील मतदारांसमोर तिसरा पर्याय ठेवला असून आठ उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत राज्यात तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडले का? या प्रश्नाचे उत्तर मात्र प्रकाश आंबेडकरांनी दिले नाही.

प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाहीर केली. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीची काल बैठक घेतली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आम्ही काही निर्णय घेतले. आमच्यासोबत जे आघाडी करण्यासाठी इच्छूक होते, त्यांना आम्ही सांगितले की, महाराष्ट्रात जरांगे पाटील फॅक्टर लक्षात घ्या. पण तो फॅक्टर लक्षात घेतला गेला नाही. जरांगे पाटील यांच्याशी काल आमची बैठक झाली. पहिल्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी विचारविनिमय करून अर्ज करण्याचे आमचे ठरले आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज आठ उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीतून वंचित बाहेर पडली आहे का? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देणे प्रकाश आंबेडकर यांनी टाळले आहे. आज फक्त उमेदवारांची घोषणा करत आहे. प्रश्नांना उत्तरे उद्या देता येतील असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भाजपने मुस्लिमांना बाजूला टाकण्याचे राजकारण सुरू केले आहे. त्यासाठी मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याचे आम्ही ठरवले आहे. जैन समाजालाही उमेदवारी देऊन त्यांना जिंकून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. मराठा, मुस्लिम आणि गरीब ओबीसी यांची सांगड घालून आम्ही नवी वाटचाल करत आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राजकारणात हल्ली प्रचंड पैसा खर्च केला जातो. त्यामुळे निवडून गेलेला नेता जनतेशी बांधिलकी न ठेवता त्याला देणगी देणाऱ्यांशी बांधिलकी ठेवतो. त्यामुळे आम्ही सामान्य जनतेला आवाहन करत आहोत की, गावागावातून लोकांनी पुढे येऊन प्रचार करावा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

वंचितने जाहीर केले उमेदवार असे

  • भंडारा-गोंदियाः संजय गजानन केवट
  • गडचिरोली-चिमूरः हितेश पांडुरंग मढावी
  • चंद्रपूरः राजेश वारलूजी बेल्ले
  • बुलढाणाः वसंत गजराम मगर
  • अकोलाः प्रकाश यशवंत आंबेडकर
  • अमरावतीः कु. प्राजक्ता टेरकेश्वर पिल्लेवान
  • वर्धाः प्रा. राजेंद्र साळुंके
  • यवतमाळ-वाशिमः क्षेमसिंग प्रतापराव पवार

ओबीसी महासंघाशी संधान?

ओबीसी बहुजन पक्ष हा ओबीसींचा नवा पक्ष स्थापन झाला आहे. या पक्षाकडून सांगली मतदारसंघातून प्रकाश शेंगडे निवडणूक लढवणार आहेत. ते लढले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!