मुंबईः गुरूनानक जयंतीनिमित्त ठाण्यातील गुरूद्वाऱ्यात गेलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यामुळे किर्तनात व्यत्यय येऊन भाविकांचा खोळंबा झाल्यामुळे तेथील सेवेकरी त्यांच्यावर प्रचंड संतापले आणि त्यांनी नड्डांसह अन्य भाजप नेत्यांना बाहेर निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला. ठाण्यातील तीनहात नाका परिसरात असलेल्या गुरूद्वारात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरूनानक जयंती असल्यामुळे ते ठाण्यातील तीनहात नाका परिसरात असलेल्या गुरूद्वाऱ्यात पोहोचले. तेथे त्यांनी दर्शन घेतले. फोटो काढण्यासाठी उभे राहिले. गुरूनानक जयंती असल्यामुळे ते गुरूद्वाऱ्यात बरीच गर्दी होती. नड्डांसोबत भाजपचे नेते, पदाधिकारी असल्यामुळे गुरूद्वाऱ्यात सुरू असलेल्या किर्तनात व्यत्यय आला आणि भाविकांचा खोळंबा झाला. त्यामुळे गुरूद्वाऱ्यातील सेवेकरी प्रचंड संतापले.
सेवेकऱ्यांनी संतापून नड्डा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना बाहेर निघून जाण्यास सांगितले. सेवेकऱ्यांनी बाहेर जाण्यास सांगताच नड्डा आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व नेते, आमदार आणि पदाधिकारी गर्दीतून वाट काढत गुरूद्वाऱ्यातून काढता पाय घेत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नड्डांसोबत गुरूद्वाऱ्यात घडलेला हा प्रकार आता चर्चेचा विषय ठरला आहे. पहा व्हिडीओ