छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): शेंद्रा एमआयडीसीत असलेल्या रॅडिको या मद्य निर्मिती कंपनीत लोखंडी टाकीची (सायलो) दुरुस्ती करतांना टाकी फाटून टाकीसह त्यातील तीन हजार टन मका अंगावर पडून चौघा मजुरांचा मृत्यू झाला तर टाकीतील मक्याखाली दबून चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेंद्रा एमआयडीसीमध्ये रॅडिको हा मद्य निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यात एका १५ वर्षे जुन्या लोखंडी टाकीच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. टाकीत पूर्वीच तीन हजार टन मका टाकलेला होता. शुक्रवारी दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्यासुमारास टाकीची वेल्डिंग सुरु असतांना अचानक टाकी फाटली आणि कोसळली. टाकीसह त्यातील तीन हजार टन मका तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडली. इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या मक्याच्या ढिगाऱ्याखाली सुमारे १५ ते २० जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मक्याच्या ढिगाऱ्याखाली आणखी कामगार दबले असण्याची शक्यता असून त्यांना जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम वृत्तदेईपर्यंत सुरु होते.
या अपघातात मत्युमुखी पडलेल्यांमध्ये विजय भिमराव गवळी (४०, रा. सिधींबन), दत्ताञय लक्ष्मण बोर्डे (४०, रा. कुंभेफळ) आणि किसन हिरडे (५०), संतोष पोफळकर (३६, भालगाव) यांचा समावेश आहे. वाल्मीक शेळके, प्रशांत सोनवणे, प्रसाद काकड आणि संदीप घोडके अशी गंभीर जखमी कामगारांची नावे असून त्यांच्यावर धूत रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. या अपघातात मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. तर वृत्त देईपर्यंत मक्याच्या ढिगाऱ्यातून जखमींना काढण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
धूत रूग्णालयात गर्दी
घटनेची माहिती मिळताच जखमींच्या आणि मृतांच्या नातेवाईकांसह कामगार संघटनांनी धूत रुग्णालयात गर्दीत केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरिक्षक गजानन कल्याणकर, तहसीलदार रमेश मुनलोड आदींसह मोठा फौजफाटा रुग्णालयात दाखल झाला होता.
कंपनी बाहेर मोठा जमाव
इतका मोठा अपघात होऊनही कंपनील इरत विभाग सुरु होते. विशेष म्हणजे अपघाताची माहिती मिळल्यानंतर कामगारांचे नातेवाईक कंपनीच्या गेटवर आले होते. मात्र कंपनी प्रशासनाने त्यांना कंपनीत सोडले नाही. या सर्व बाबींमुळे रात्री कंपनीसमोर सुमारे दोनशे ते अडीचशे लोकांचा जमाव उभा होता. ते कंपनीतील एकाही कर्मचाऱ्याला बाहेर येऊ देत नव्हते.
पोकलेन, जेसीबीने ढिगारा बाजूला
घटनेची माहिती मिळताच शेंद्रा अग्निशमन विभागाची एक गाडी व मनपा अग्निशमन केंद्राच्या २ गाड्या घटनस्थळावर पथकासह शोध कार्य करत आहेत. मक्याच्या लोखंडी टाकीत तीन हजार टन मका टाकलेली होती. टाकीचे मेंटेनन्स चालू असतांना टाकीतील मका कामगारांच्या अंगावर पडली आणि १३ कामगार त्याखाली दबले. जेसीबी आणि पोकलॅन्डने मका काढण्याचे काम सुरु आहे.
तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही
या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी घाटी आणि धूत रुग्णालयात अक्रोश सुरु होता. दरम्यान इतकी मोठी घटना घडूनदेखील कंपनी प्रशानसाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने अपघातात मृत आणि जखमींच्या नातेवाईकांची साधी भेटदेखील घेतली नाही. त्यामुळे जोपर्यंत कंपनी प्रशासन भेटणार नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याची भूमिका नातेवाईक आणि कामगार संघटनांनी घेतली होती.
१७ अपघात होऊनही कंपनीचे दुर्लक्ष
कारखान्याने वारंवार सुरक्षा व्यवस्थेतकडे दुर्लक्ष केले, आतापर्यंत १७ अपघात झाले आहेत. ऐवढे अपघात होऊनही याकडे कंपनी प्रशासनाने कायमस्वरुपी दुर्लक्ष करते. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालू ठेवणार, असे सिटूचे सचिव अजय भवलकर यांनी म्हटले आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
रॅडिको कंपनीत झालेल्या अपघातानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कंपनीला भेट देऊन पाहणी केली. गुन्हेगारावर सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तसेच त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशाही मागणी केली.