राज्यात ५ डिसेंबरला होणार सरकारची स्थापना, सायंकाळी ५ वाजता होणार आझाद मैदानावर शपथविधी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच?


मुंबईः विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? हे महायुतीला अद्याप जाहीर करता आलेले नाही. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत निर्माण झालेला तिढा कायम असतानाच महाराष्ट्रात ५ डिसेंबर रोजी नवे सरकार स्थापन होईल आणि सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मुख्यमंत्रिपदावर अद्याप कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नसल्यामुळे भाजपचे हायकमांड पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदेंनाच विराजमान करण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून पुढे येत आहे.

महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले. २८८ पैकी महायुतीला तब्बल २३५ जागा मिळाल्या. एवढे प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीला मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवून सरकार स्थापन करता आले नाही. त्यामुळे राज्यात नवे सरकार कधी स्थापन होणार?  आणि नव्या सरकारचा मुख्यमंत्री कोण असणार? याची राज्यातील जनतेला कमालीची उत्सुकता लागलेली आहे.

मुख्यमंत्रिपद मिळत नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यामुळे ते महायुतीची महत्वाची बैठक असलेल्या दिवशीच त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी निघून गेल्याच्या बातम्याही आल्या. त्यामुळे महायुतीत सगळे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून नव्या सरकारच्या शपथविधीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

‘राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी… विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरूवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे,’ असे बावनकुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

महायुतीच्या नव्या सरकारबाबत नवी दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत गुरूवारी बैठक झाली. तीन तास चाललेल्या या बैठकीत महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप याबाबत सहमती झालेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागण्यांमुळे भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी साधी बैठकही होऊ शकलेली नाही.

अशातच आता खात्रीलायक सूत्रांकडून एक बातमी पुढे येत आहे. भाजप पक्षश्रेष्ठी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदेंचीच वर्णी लावण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात महायुतीने लढवल्या. त्यामुळे शिंदेंना डावलून मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस किंवा अन्य कुणाची वर्णी लावली तर जनमताचा अनादर केला गेला, असा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो. जनमताचा अनादर होऊ नये, असा एक मतप्रवाह भाजपच्या नेत्यांत आहे.

दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेतील विसंगतींचा मुद्दा तापवलेला आहे. नवे सरकार आल्याबरोबर सामूहिक आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दाही पुन्हा तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नावाचाच विचार दिल्लीतील भाजपश्रेष्ठी करत असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या काही महिन्यात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा विचार गांभीर्याने केला जात असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

केंद्रातील सरकारच्या स्थैर्याचीही चिंता

भाजपला विधानसभा निवडणुकीत १३३ जागा मिळाल्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी जोरदार लॉबिंग भाजपचे आमदार आणि राज्यातील नेते करत आहेत. परंतु तसे केल्यास भाजपने मित्रपक्षाच्या गळ्यात टाकलेला मैत्रीचा हात गळफास होतो आणि तो मित्रपक्ष बाजूला सारला जातो, असा संदेश त्यातून जाईल आणि हा संदेश केंद्रातील सरकारच्या स्थैर्यावरही विपरित परिणाम करू शकेल, अशी भीती भाजप नेतृत्वाला असल्याचे सूत्रांकडून समजते.

मुख्यमंत्रिपदावर मराठा चेहराच

महाराष्ट्राच्या राजकारणाचा एकूण पोत पाहता एकनाथ शिंदे यांना लगेचच मुख्यमंत्रिपदावरून हटवून त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीसांना बसवले तर पुरोगामी महाराष्ट्रात भाजपने पुन्हा ‘पेशवाई’ आणल्याची टीका विरोधकांकडून केली जाऊ शकते, ही सर्वात मोठी भीती भाजप पक्षश्रेष्ठींना आहे. ही टीका आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला तर भाजपला निवडणुकीला सामोरे जाणे मुश्कील होईल, अशीही भीती आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून मराठा चेहराच शोधला जात आहे.

त्यातच आरएसएसने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावासाठी भाजपवर दबाव आणला असल्याची माहितीही पुढे येत आहे. त्यामुळे भाजपमधील मराठा चेहरा पुढे करण्याऐवजी एक-दीड वर्षासाठी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रिपदावर बसवण्याच्या मनःस्थितीत भाजप पक्षश्रेष्ठी आल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!