मुंबईः महाराष्ट्रातील नव्या महायुती सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले असले तरी महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण? यावरून सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पुण्याचे भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता भाजपचे आणखी एक नेते रविंद्र चव्हाण यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आले आहे. आ. रविंद्र चव्हाण यांनी राजधानी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत राजकीय निर्णय घ्यायचा की भावनिक निर्णय घ्यायचा? या गोंधळेल्या अवस्थेत भाजप सापडला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागून तब्बल ९ दिवस उलटत आले तरी भाजपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवता आलेला नाही. प्रारंभी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्यामुळे महायुतीच्या नव्या सरकारच्या स्थापनेचे घोडे अडल्याची चर्चा होती. परंतु आपण काहीही अडवून धरलेले नाही, असे सांगत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच जाहीर करून मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेतून माघार घेतली.
एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम असल्याचे बोलले जात होते. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांना बोलवून घेऊन बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास महाराष्ट्रात काय प्रतिक्रिया उमटू शकते, याची चाचपणी केली. त्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी पुण्याचे भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत आले. परंतु त्यांनीही आपल्या नावाची चर्चा निरर्थक असल्याचे सांगून टाकल्यानंतर आता आणखी एक भाजप नेते आ. रविंद्र चव्हाण यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आ. रविंद्र चव्हाण यांना देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते. त्यामुळे पालघरचा दौरा अर्धवट सोडून आ. चव्हाण दिल्लीला रवाना झाले. तेथे त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आक्षेप असेल तर आ. रविंद्र चव्हाण यांना संधी देण्यात यावी, अशी खेळी खेळली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
आ. रविंद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. त्यांनी महानगरपालिकेचे सभापती म्हणूनही काम पाहिले आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. आ. चव्हाण मागच्या महायुती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांनी रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे.
…पण चव्हाण म्हणतात मी दिल्लीला गेलोच नाही!
दरम्यान, या सर्व चर्चांवर आ. रविंद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एक्सवर ट्विट करून त्यांनी या चर्चांचे खंडण केले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसांत किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, असे आ. चव्हाण यांनी म्हटले आहे.