‘मायमराठी’चीच दैनाः दहावीच्या परीक्षेत मराठी मातृभाषा असलेले तब्बल ९४ हजार ५४४ विद्यार्थी मराठी विषयातच नापास!


पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत मराठी मातृभाषा असलेले तब्बल ९४ हजार ५४४ विद्यार्थी मराठी विषयाच्याच पेपरमध्ये नापास झाले आहेत. ही आकडेवारी धक्कादायक असून मराठी भाषेच्या अध्यापन प्रक्रियेवरच त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.

या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उतीर्णतेची टक्केवारी ९२.०९ इतकी आहे.

या परीक्षेत एकूण ३५ विषयांपैकी १२ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांचीही संख्या वाढत चालली आहे. मात्र प्रथम भाषा म्हणून मराठी विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या राज्यातील सुमारे १० लाख ८७ हजार ६९९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८० हजार ८०३ विद्यार्थी नापास झाले आहेत. म्हणजेच जवळपास ८ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. तर द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या एकूण ४ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ७४१ विद्यार्थी नापास झाले आहेत. मराठी हीच मातृभाषा असलेले विद्यार्थी मराठी विषयातच नापास होत आहेत, याचा अर्थ या विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य अवगत नसल्याचेच स्पष्ट होत असून मराठी विषयाच्या अध्यापन प्रक्रियेच्या पुनर्विचाराची गरज यानिमित्ताने अधोरेखित केली आहे.

मुलींचीच टक्केवारी अधिक: दहावीची परीक्षा दिलेल्या एकूण ८ लाख २० हजार ४२७ मुलांपैकी ७ लाख ३४ हजार ८१४ मुले (८९.५६ टक्के) तर एकूण ७ लाख २२ हजार ०४५ मुलींपैकी ६ लाख ८५ हजार ६७२ मुली (९४.९६ टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.४० ने अधिक आहे.

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक: सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.६२ टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१ टक्के) आहे. इतर विभागांमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ९५.४७ टक्के, मुंबई- ९४.९७, पुणे- ९४.२४, नाशिक- ९०.५३, अमरावती- ९०.५०, नागपूर- ८९.०७ तर लातूर विभागाचा निकाल ८८.४२ टक्के लागला आहे.

श्रेणीनिहाय निकाल: एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण २७.४१ टक्के, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण ३१.२६ टक्के, द्वितीय श्रेणीमध्ये २४.६६ टक्के तर उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८.७५ टक्के इतके आहे.

श्रेणीसुधार/ गुणसुधार योजना: परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत लगतच्या तीन परीक्षांमध्ये पुनःश्च प्रविष्ट होता येईल. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या) जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७, जून-जुलै २०२७  च्या दहावीच्या  परीक्षेस ‘श्रेणीसुधार/ गुणसुधार’ साठी प्रविष्ट होण्यास तीन संधी देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!