‘अरे मध्ये कोणाला जाऊ देऊ नको, त्या दायमीला मारून टाक की’  कोरोना काळातील लातूरच्या डॉक्टरांच्या धक्कादायक संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल!


लातूरः जगाला हादरवून टाकणाऱ्या कोरोना व्हायरसच्या महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे माणसातील ‘देव’ म्हणून सगळ्यांनीच कौतुक केले. परंतु डॉक्टरी पेशालाच काळीमा फासणारी लातूर जिल्ह्यातील दोन सरकारी डॉक्टरांमधील ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर कोरोनाग्रस्त रुग्णाला चक्क मारून टाकण्याचा सल्ला देत आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

२०२० मध्ये कोरोना महामारीने देशभर थैमान घातले होते. कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी बेड्सही मिळणे अवघड होऊन बसले होते. या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवतोड प्रयत्न केले रुग्णांवर उपचार करता करताच काही डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात काही जणांनी जीवही गमावला आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा सामान्य रुग्णालयांबरोबरच कोरोना सेंटर्सही तयार केले होते. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातही असे तीन कोरोना सेंटर होते. उदगीरच्या शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशीकांत देशपांडे आणि तीनपैकी एका कोरोना सेंटरवर कार्यरत असलेले डॉ. शशीकांत डांगे यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप आता तब्बल चार वर्षांनंतर व्हायरल झाली असून या संभाषणात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देशपांडे हे कोरोनाग्रस्त रुग्णाला चक्क मारून टाकण्याची चिथावणी देत असल्याचे ऐकायला मिळत आहे.

दोन डॉक्टरांमधील संभाषण असे

डॉ. शशीकांत देशपांडेः राऊंड घ्या आणि पेशंट्स पटापट काढायचे बघा जरा… ओटू कॉन्स्ट्रेट रिकामे आहेत का काही?

डॉ. शशीकांत डांगेः  नाही नाही… एकबी नाही भावा, दोनवर पेशंट आहेत, एक गाडीत आहे. शिफ्ट करताना अवघड व्हायलेय म्हणून गाडीतच ऑक्सिजन लावले आहे…

डॉ. शशीकांत देशपांडेः अरे मध्ये कोणाला जाऊ देऊ नको अन् त्या दायमीला मारून टाक की. मायला तुलाही त्यांचे (पेशंटच्या जातीचा उल्लेख) लई करायची सवय आहे पहिल्यापासून. एवढा ओटू जातोय?

डॉ. शशीकांत डांगेः कुणाला?

डॉ. शशीकांत देशपांडेः एवढा मोठा ओटू जातोय त्या दायमीला…?

डॉ. शशीकांत डांगेः नाही नाही… अरे कमी केलेय की रात्रीपासून. दोन लिटरवर आणलेय सगळ्याला…

डॉ. शशीकांत देशपांडेः बघा बघा कमी करा. मागू नका आम्हाला काही.

डॉ. शशीकांत डांगेः हा…

गुन्हा दाखल, डॉक्टर फरार

उदगीरचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशीकांत देशपांडे हे एका कोरोनाग्रस्त रुग्णाला मारून टाकण्याची चिथावणी डॉ. शशीकांत डांगे यांना देत असल्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संभाषणात उल्लेख झालेला दायमी नावाचा रुग्ण दायमी गौसोद्दीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेच्या पतीने हे संभाषण ऐकून उदगीर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. शशीकांत देशपांडे यांच्याविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. देशपांडे फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वैद्यकीय नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील या दोन सरकारी डॉक्टरांमधील हे संभाषण वैद्यकीय नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारे आहे. एका रुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न करण्याऐवजी त्याचा जीव घेण्याची चिथावणी वरिष्ठ डॉक्टरांकडून दिली जाणे ही बाब केवळ धक्कादायकच नाही तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. उदगीर पोलिस या दोन डॉक्टरांमधील संभाषणाच्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून पहात असून न्यूजटाऊन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!