दिशा सालियनचा ना बलात्कार करून खून, ना आत्महत्या; दारूच्या नशेत तोल गेल्यानेच मृत्यूः सीबीआयचा मोठा खुलासा


मुंबईः महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणाऱ्या दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजरच्या मृत्यूप्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. दिशा सालियनने आत्महत्या केल्याचा, तिच्यावर बलात्कार करून खून करण्यात आल्याचे गंभीर आरोप झाले होते परंतु दिशाच्या मृत्यूचे कारण यापैकी काहीएक नसून दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असा खुलासा सीबीआयने केला आहे. त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचे, तिच्यावर बलात्कार करून खून केल्याचे आरोप खोटे ठरले आहेत.

दिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेल्याने आणि १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळेच मृत्यू झाल्याचा खुलासा सीबीआयच्या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

 सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवस आधी २०२० मध्ये इमारतीच्या १४ व् मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरूवातीला ही आत्महत्या असल्याचे सांगितले गेले. नंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले आणि दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

राणेंनी केले होते आदित्य ठाकरेंवर आरोपः भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियन मृत्यू प्रकरणात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा खळबळजनक आणि गंभीर आरोप केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियनचा खून झाला. तिच्यावर बलात्कार करून खून करण्यात आला. त्या प्रकरणातील आरोपींना अटक का झाली नाही?  कोण मंत्री होता? का वाचवण्यात आले? सचिन वाझेंना पोलिस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवण्यात आले, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता.

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे होते, अशी लोक चर्चा करतात. सचिन वाझेंनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. अशी पापं करायला मुख्यमंत्री झाला होतात का?  आता तुमची सत्ता नाही. त्यामुळे त्यातील आरोपी पकडले जातील, असा इशाराही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता.

ज्यांनी आरोप केले त्यांच्यासाठी अहवाल- आदित्यः दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआयचा अहवाल आल्यानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली. या घाणेरड्या राजकारणात मी जाऊ इच्छित नाही. त्या चिखलात मला पडायचेच नाही. म्हणून ज्यांनी या प्रकरणात आरोप केले, त्यांच्यासाठी हा अहवाल आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंची माफी मागा-राऊतः दिशा सालियन प्रकरणात भाजपचे नेते आणि महिला नेत्यांनी आरोप केले होते. त्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. केंद्रीय तपास यंत्रणेचा अहवाल समोर आला आहे तर तोंडाची थुंकी का उडवत होता? एका तरूण नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!