नवी दिल्लीः कथित मद्य घोटाळाप्रकरणी तिहार तुरूंगातून जामिनावर बाहेर येताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मोठा धमाका केला. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत त्यांनी दोन दिवसांत आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषमा केली आहे.
अरविंद केजरीवाल रविवारी सकाळी आम आदमी पक्षाच्या (आप) नवीन मुख्यालयात पोहोचले. तेथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी आपच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि राजीनाम्याची घोषणा केली. यापूर्वी केजरीवाल जेव्हा तुरुंगात गेले होते, तेव्हा भाजपकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. परंतु तेव्हा केजरीवाल यांनी राजीनामा दिला नव्हता.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, न्यायालयाने मला जामीन दिला असला तरी खटला सुरू राहणार आहे. मी माझ्या वकिलांशी चर्चा केली आहे. जोपर्यंत खटला संपुष्टात येत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. दोन दिवसांनंतर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता मला पुन्हा निवडून पाठवत नाही, मी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.
दिल्ली अबकारी धोरणातील कथित घोटाळाप्रकरणी जवळपास सहा महिने अटकेत राहून तिहार तुरूंगातून बाहेर आल्याच्या दोन दिवसांनंतरच केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित कथित घोटाळ्यात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारीच केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर केजरीवाल तिहार तुरूंगातून बाहेर आले आहेत.
लोकशाही वाचवायची होती म्हणून…
तुरुंगात जाण्यापूर्वी किंवा तुरुंगात असताना राजीनामा का दिला नाही? या प्रश्नाचे उत्तरही केजरीवाल यांनी दिले. ते म्हणाले, मी तुरुंगात गेल्यानंतर राजीनामा दिला नाही कारण मला लोकशाही वाचवायची होती. जर मी तुरुंगातून राजीनामा दिला असता तर त्यांनी विरोधी पक्षाच्या सर्वच मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकून सरकारे पाडली असती. माझी विरोधी पक्षाच्या सर्वच मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी तुम्हाला तुरुंगात टाकले तरी तुम्ही राजीनामा देऊ नका. कारण तुरुंगातूनही सरकार चालवले जाऊ शकते, हे आम्ही दाखवून दिले आहे.
पुन्हा निवडून दिले तरच खुर्चीवर बसेन
राजीनाम्याची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले की, मी लोकांमध्ये जाईन आणि मते मागेन. केजरीवाल ईमानदार आहे, असे लोकांना वाटत असेल तरच मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर जाऊन बसेन, अन्यथा बसणार नाही. मी आताच तुरुंगातून बाहेर आलो, मग मी राजीनामा का देत आहे?, असे तुम्हा लोकांना वाटत असेल. त्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत… ते म्हणत आहेत की सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना अटी घातल्या आहेत. मी राजीनामा दिल्यानंतर ‘आप’ची उच्चस्तरीय बैठक होईल आणि त्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित केले जाईल. सिसोदिया आणि मी दोघेही या बाबीवर जोर होतो. तेही कोणताही पदभार सांभाळणार नाहीत. आम्ही दोघेही आमच्या खुर्चीवर तेव्हाच बसू, जेव्हा लोक आम्हाला निवडून देतील.
भाजपवाले ईमानदारीलाच घाबरतात
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२५ ऐवजी नोव्हेंबर २०२४ मध्येच घ्या, अशी मागणीही केजरीवाल यांनी यावेळी केली. केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील सरकारी शाळांची अवस्था अत्यंत दयनीय होती. पण आम्ही सरकारी शाळा बदलून दाखवल्या. आम्ही दिल्लीत मोहल्ला क्लिनिक आणि अनेक नवीन सरकारी रुग्णालये उभारली, उपचार आणि औषधे मोफत केले. महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली. दिल्लीत २४ तास मोफत वीज मिळत आहे. ही सर्व कामे आम्ही करू शकलो, कारण आम्ही ईमानदार आहोत. भाजपवाले आमच्या ईमानदारीलाच घाबरतात आणि त्यामुळेच त्यांनी आम्हाला तुरुंगात टाकले.
तुम्ही केजरीवालला ईमानदार मानता की गुन्हेगार? हे आज मी जनतेला विचारण्यासाठी आलो आहे. आता जोपर्यंत दिल्लीची जनता आपला फैसला देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. मी आजपासून दोन दिवसांनंतर मुख्यंमत्रिपदाचा राजीनामा देईन, असे केजरीवाल म्हणाले.