छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): राज्य सरकारने मुंबई शहर, मुंबई उपनगर व अन्य काही जिल्ह्यात सोमवारची (१६ सप्टेंबर) ईद-ए-मिलादची सार्वजनक सुट्टी रद्द करून ती बुधवारी (१८ सप्टेंबर) जाहीर केली असली तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मात्र ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी सोमवारीच कायम राहील, असा निर्णय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आहे.
मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून मुस्लिम बांधवांकडून साजरा करण्यात येणारा ईद-ए-मिलाद हा सण आणि अनंत चतुर्दशी लागोपाठ आले आहेत. ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून जुलूस काढण्यात येतात तर अनंत चतुर्दशीला हिंदू बांधवांकडून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढल्या जातात.
सोमवारी (१६ सप्टेंबर) मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद सण आणि मंगळवारी (१७ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्यामुळे दोन्ही समाजात शांतता व सलोखा कायम रहावा म्हणून राज्य सरकारने मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांत सोमवारची ईदची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती बुधवारी (१८ सप्टेंबर) जाहीर केली आहे. तशी अधिसूचना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.
हेही वाचाः ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी १६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी, राज्य सरकारने काढली अधिसूचना
मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची तारीख विचारात घेऊन सोमवारी (१६ सप्टेंबर) जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने कळवले होते.
राज्य सरकारने केलेल्या या सूचनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सकाळी पोलिस आयुक्त् प्रवीण पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी सोमवारीच (१६ सप्टेंबर) कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.