सीएमओतील ‘ओएसडी’चा प्रतिष्ठित शिक्षण संस्थांना गंडा, मुख्यमंत्र्यांच्या नावानेच नामांकित महाविद्यालयांत प्रवेशाचे रॅकेट!


पुणेः मंत्रिपदाचे आमिष दाखवून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नावाने आमदारंना गंडा घालणारा भामटा पकडला गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी टू सीएमओ)  असल्याचे सांगून एका भामट्याने पाचहून अधिक शिक्षण संस्थांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांना नामवंत महाविद्यालयात प्रवेश देतो असे सांगून नामवंत शिक्षण संस्थांतील अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) नावाने विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करण्यासाठी दबाव आणला जात होता. याप्रकरणी सीएमओकडूनच पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

राहुल पलांडे याने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील (सीएमओ)विशेष कार्यकारी अधिकारी असल्याची बतावणी करून पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थांना गंडवल्याचे उघडकीस आले आहे. राहुल पलांडे व त्याच्या सहकाऱ्यांनी सीएमओबरोबरच आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याही नावाने पुण्यातील शिक्षण संस्थांना फोन केल्याचे उघडकीस आले आहे. हे एक मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे.

 सिम्बॉयसीस, डीवाय पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ, तानाजी सावंत यांचे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ या नामवंत शिक्षण संस्थांशिवाय पुण्यातील नामवंत महाविद्यालयांत प्रवेश मिळवून देतो, असे सांगून विद्यार्थ्यांकडून राहुल पलांडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लाखो रुपयांची मागणी केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

 नामवंत शिक्षण संस्थांमध्ये एमबीए, लॉ, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून देण्यासाठी राहुल पलांडे याने स्थानिक आमदार, खासदार यंचे नाव घेऊन तसेच त्यांचे लेटरहेड वापरून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिले आणि लाखो रुपये उकळल्याचेही समोर आले आहे.

राहुल पलांडेने सिम्बॉयोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीसह अन्य चार नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये चार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले सीएमओतील या बनावट अधिकाऱ्याच्या या दबावामुळे या शिक्षण संस्थांनी निमूटपणे प्रवेश देऊ केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पुणे दौऱ्यावर आले असता सिम्बायोसिस इंटरनॅशन युनिव्हर्सिटीसह अन्य काही शिक्षण संस्थांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. या भेटीत सीएमओमधील ओएसडीच्या सांगण्यावरून प्रतिष्ठित सिम्बायोसिस इंरटनॅशनल युनिव्हर्सिटी ग्रुपच्या पुणे, लव्हाळे, हिंजवडी आणि बंगळुरू येथील महाविद्यालयांमध्ये चार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

शिक्षण संस्थांच्या या शिष्टमंडळाने सीएमओमध्ये काम करत असल्याचा दावा करणाऱ्या या बनावट ओएसडीच्या मोबाईलचे स्क्रीन शॉट्सही दाखवले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाने प्रवेश मागितल्याचे  स्पष्ट झाले आणि हा घोटाळा उघडकीस आला.

मुख्यमंत्र्यांच्या नावाने दबाव टाकून नामवंत शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देणारे हे रॅकेट लक्षात आल्यानंतर सीएमओकडूनच पुण्याच्या हिंजवडी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीएमओतील नितीन यू. पानसरे यांच्या फिर्यादीवरून राहुल राजेंद्र पलांडे याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

राहुल राजेंद्र पलांडे हा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता असून तो दर्शनगिरी बिल्डिंग, ३१ केशवनगर, पिंपरी चिंचवड येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!