इयत्ता बारावीचा निकाल जाहीर: राज्याचा निकाल ९१.२५ टक्के;  मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्के जास्त!


पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याच्या निकालाची टक्केवारी ९१. २५ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात २.९७ टक्के घट झाली आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागात २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी सामोरे गेले होते. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी आहे. राज्यभरात ३ हजार १९५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९१.१ टक्के तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.१३ टक्के लागला आहे.

मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे.  या परीक्षेत  उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९३.७३ टक्के आहे तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.१४ टक्के आहे.

या परीक्षेत १ लाख ३१ हजार ५६१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. १ लाख ७६ हजार ७६३ विद्यार्थ्यांना ३५ ते ४५ टक्के गुण मिळाले आहेत.

गुण पडताळणी ५ जूनपर्यंत

निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मेपासून ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येतील. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येतील.

विभागीय मंडळनिहाय निकाल असा

पुणे विभागाचा निकाल ९३.३४ टक्के, नागपूर विभागाचा निकाल ९०.३५ टक्के, औरंगाबाद विभागाचा निकाल ९१.८५ टक्के, मुंबई विभागाचा निकाल ८८.१३ टक्के, कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.२८ टक्के, अमरावती विभागाचा निकाल ९२.७५ टक्के, नाशिक विभागाचा निकाल ९१.६६ टक्के, लातूर विभागाचा निकाल ९०.३७ टक्के, कोकण विभागाचा निकाल ९६.१ टक्के.

शाखानिहाय निकाल असा

कला शाखेचा निकाल ८४.०५ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ९६.९ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९०.४२ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ९१.२५ टक्के.

ऑनलाइन असा पहा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेला इयत्ता बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजेपासून ऑनलाइन पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः

या लिंकवर क्लिक करून तुमचा रोल नंबर आणि जन्म तारखेसह आवश्यक माहिती भरल्यास तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

एसएमएसद्वारे असा पहा निकाल

एसएमएसद्वारे असा पहा निकालः बारावीचा निकाल एसएमएसद्वारेही पाहता येणार आहे. त्यामुळे इंटनेट नसले तरीही तुम्हाला तुमचा निकाल थेट तुमच्या मोबाईलवर प्राप्त करता येईल. त्यासाठी कॅपिलटमध्ये MHHS  असे टाइप करा. त्यापुढे तुमचा रोल नंबर टाका आणि 57766 या क्रमांकावर सेंड करा. काही क्षणातच तुम्हाला तुमचा निकाल प्राप्त होईल.

www.maharesult.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांना www.mahahscboard.in  या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!