तू गप्प बस, नाही तर टपकन वर जाशीलः मनोज जरांगेंची वयाने ३६ वर्षे मोठे असलेल्या छगन भुजबळांना एकेरी भाषेत धमकी


जालनाः मी तुला सांगतो, तू माझ्या नादाला लागू नको… तुझे वय झाले आहे… तुला आता लोड झेपत नाही… तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील, अशा एकेरी शब्दांत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल ३६ वर्षांनी मोठे असलेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांना धमकावले.

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यावरून गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, अशी भूमिका छगन भुजबळ हे प्रारंभीपासूनच मांडत आहेत तर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करा, अशी मनोज जरांगेंची मागणी आहे. यावरूनच दोघांत कायम खटके उडत आहेत.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा जन्म १९८२ चा असून ते ४२ वर्षांचे आहेत तर ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा जन्म १९४७ चा असून ते ७७ वर्षांचे आहेत. जरांगे आणि भुजबळ यांच्यात तब्बल ३६ वर्षे वयाचे अंतर आहे. परंतु मनोज जरांगेंकडून भुजबळांवर टीका करताना कायम एकेरी आणि हिणकस भाषा वापरली जात असल्याचे पहायला मिळत आहेत. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा जालन्यात आली.

तुझे आता वय झाले आहे आणि या वयात एवढा लोड तुला झेपत नाही. तू गप्प बस, नाही तर टपकन वर जाशील. गप्प राहा, येडपट माणूस आहे. हे कसं ओबीसींच्या हाताला लागले, अशा एकेरी शब्दांत मनोज जरांगेंनी भुजबळांवर टीका केली.

मला म्हणतो उपोषण करू नको, तू नको करू आंदोलन, गप्प पड एका जागी. तू माझ्या नादी लागू नको. तुझे वय झाले आहे. तुझ्या वयानुसार आम्ही तुझा आदर करू. तू गप्प बसला तर शंभर टक्के तुझा आदर करू पण जर गप्प नाही बसला तर तुला मी काही सोडत नाही, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी भुजबळांना धमकावले.

मराठे ओबीसी आरक्षणात गेले आहेत. आता हेच ओबीसी बांधव त्याला (छगन भुजबळ) म्हणत आहेत की तू काय कामाचा आहेस? तुला बाहेर निघायची वेळ आली आहे. आम्ही सगळे मिळून तुला बाहेर फेकतो, असे एकेरी येत मनोज जरांगेंनी भुजबळांवर टीका केली. जरांगेंच्या या टिकेला आता भुजबळ कसे प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!