बजेटमधून आरक्षण द्या म्हणणारा असा कसा तुमचा नेता? भुजबळांनी उडवली जरांगेंची खिल्ली; म्हणाले, १६ नोव्हेंबरलाच राजीनामा दिला!


अहमदनगरः मला मराठा समाजातील नेत्यांची आणि विचारवंतांची कीव येते. असा कसा तुमचा नेता, जो म्हणतो बजेटमधून आरक्षण देता येते का पहा. कुणाच्या मागे चाललात तुम्ही? अशा शब्दांत ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली. मी १६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असा गोफ्यस्फोटही भुजबळांनी केला.

राज्य सरकारने मराठा समाजातील गणगोत आणि सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसीत समाविष्ट करण्याबाबतची अधिसूचना काढली. त्यावरून राज्यभरातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आणि रस्त्यावर उतरून लढाईचे रणशिंग फुंकले. त्याचाच एक भाग म्हणून आज अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात भुजबळांनी राज्य सरकारच्या विरोधात दंड थोपटले आणि भुजबळांना मंत्रिमंडळातून हाकला म्हणणाऱ्यांनाही चोख उत्तर दिले.

 सरकारमधील लोक आणि विरोधी पक्षाचे नेते भुजबळ तुम्हाला पटत नसेल तर राजीनामा द्या असे बोलतात. सरकारमध्ये का राहता? सरकारवर टीका करता आणि त्याच सरकारमध्ये कसे राहता?  हिंमत असेल तर राजीनामा द्या. काल कोणीतरी बोलले या भुजबळाच्या कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा. मला या सर्वांना, माझ्या विरोधकांना, स्वपक्षातील आणि स्वसरकारमधील लोकांना सांगायचे आहे की मी आधीच राजीनामा दिला आहे. १७ नोव्हेंबरला अंबडमध्ये ओबीसींची पहिली एल्गार रॅली झाली. त्याच्या एक दिवस आधीच म्हणजे १६ नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो, असे भुजबळ म्हणाले.

मला हाकलण्याची गरज नाही. मी अडीच महिने शांत राहिलो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्याची वाच्यता नको. मी ओबीसींसाठी शेवटपर्यंत लढणार आहे. मी मनाशी एकच उद्देश ठेवला आहे, तो म्हणजे जीवन हे संग्राम, बंदे ले हिंमत से काम… असे म्हणत भुजबळांनी या मेळाव्यात दंड थोपटले.

कुणाच्या मागे चाललात तुम्ही?

 भुजबळ यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, एवढा मोठा जोक कधी झालाच नव्हता. उपोषणवाले साहेब म्हणतात, बजेटमधून आरक्षण मिळालं तर बघा. मला याचे वाईट वाटले.  अर्थमंत्री सीतारमन सगळे बोलल्या मात्र आरक्षणाचे काहीच बोलल्या नाहीत. मला काही समजत नाही. मला मराठा समाजातील नेत्यांची आणि विचारवंतांची कीव येते. असा कसा तुमचा नेता, जो म्हणतो बजेटमधून आरक्षण देता येते का पहा. यावर कोणी बोलायला तयार नाही. कुणाच्या मागे चाललात तुम्ही? असा खोचक सवाल भुजबळांनी केला.

उपोषणवाले साहेब म्हणतात, मंडल आयोग संपवू

 गावागावात दरी पडत आहे. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढतो. आम्ही सांगतो आमचे आरक्षण कमी करू नका. त्यांना वेगळे आरक्षण द्या. ही आमची मागणी चुकीची आहे का? आज गावागावात ओबीसींना छळले जात आहे. पोलिस तक्रार घेत नाहीत. तरीही उपोषणकर्ता म्हणतो, पूर्ण मंडल आयोग चॅलेंज करून संपवून टाकतो. त्यांना ओबीसीमधून आरक्षण घ्यायचे आणि मंडल आयोग संपवायचा आहे. मात्र त्या मंडलमध्येच ओबीसी आरक्षण आहे ना. ते संपले तर हेही जाईल. तरीही हे का मागता? सर्व ठिकाणी दादागिरी सुरू आहे, असे भुजबळ म्हणाले.

 फडणवीसांच्या गृह विभागाकडून भेदभाव

श्रीगोंद्यात ओबीसी एल्गार सभेची पूर्वतयारी सुरू असताना तेथे पोलिस पाठवण्यात आले आणि काम थांबवण्यात आले. पोलिसांकरवी ओबीसी समाजात दहशत निर्माण केली जात आहे. त्यांना नोटिसा दिल्या. नोटीस देण्याच्या नावाखाली लोकांच्या सह्या घेतल्या. हे सगळे नेमके काय चाललेय? असा सवाल करत भुजबळांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसानाही जाब विचारला. देवेंद्र फडणवीस साहेब, हे सगळे काय चाललेय?  तुमच्या गृह विभागाला सांगा. तुमच्या गृह विभागाकडून असा भेदभाव होता कामा नये. जे काही नियमाने असेल ते सगळ्यांनी करावे. आम्हाला एक न्याय आणि त्यांना रात्री ३ वाजता सभेची परवानगी कशी मिळते? असे भुजबळ म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!