मुंबई: हिंगोली जिल्ह्यातील मौजे नर्सी नामदेव येथील जमिनीची विरासत मोईनुल्ला हुसेनी पि.स. अहेमदतुल्ला व स. मोबीनुल्ला पि. अहमददुल्ला हुसेनी यांचे नावे मंजूर आहे. या संपूर्ण जमिनीच्या फेरफाराची चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. विखे पाटील म्हणाले की, मराठवाड्यात मदतमास व खिदमतमास अशा दोन प्रकारच्या जमिनी आहेत. नर्सी नामदेव येथील जमीन ही जमिनी खासरा पत्रकानुसार दर्गा नुरी शहिदीचा इनाम आहे. तसेच मिरविलायत अली खैरातअली यांच्या नावाची नोंद खासरा पत्रकात इनामदर म्हणून दर्शविली आहे.
ही जमीन २५.९६ हेक्टर असून सध्या ९.३२ हेक्टर क्षेत्र शिल्लक आहे. या जमिनीची पहिल्यांदा १९८८ मध्ये नोंद घेण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात अपर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीच्या अहवालाअंती या प्रकरणात संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे विखे पाटील म्हणाले.