बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक, १०० कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका; नस्ती नसलेल्या राज्यभरातील शिक्षकांचीही चौकशी!


मुंबई/नागपूरः राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी मोठी कारवाई केली.  ३९८ बोगस शालार्थ आयडी तयार करून तब्बल १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवत नागपुरातून दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक केली आहे. दरम्यान, एसआयटीने राज्यभरातील बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याचीही चौकशी सुरू केली असून या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास ३ हजार कोटींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नागपुरातून उघडकीस आलेल्या बोगस शालार्थ आयडी आणि बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरली असल्याची माहिती तपासातून समोर आल्यानंतर राज्य सरकारने नागपूरचे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. राज्यभरातील बोगस शालार्थ आयडीची सर्व प्रकरणे याच एसआयटीकडे पाठवण्याचे आदेश पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी यापूर्वाच दिले आहेत. या तपासाचा नियमित अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पोलिस महासंचालकांच्या वतीने विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी सोमवारी बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या चौकशीसाठी पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केल्याचे आदेश जारी केल्यानंतर बुधवारी या एसआयटीने ही मोठी कारवाई केली.

शिक्षण विभागाने ६३२ शिक्षकांना देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या चौकशीच्या आदेश दिले आहेत. त्याच्या चौकशी करत असताना एसआयटीने माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी विठोबा कुंभार (वय ४९ वर्षेः आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर श्रीराम काळुसे (वय ५० वर्षे) यांना अटक केली आहे. कुंभार आणि काळुसे या दोघांनी २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ या कालावधीत नियमानुसार शालार्थ आयडी तयार करण्याची प्रक्रिया बंद असतानाही ३९८ शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार केले. काळुसे यांनी १५४ तर कुंभार यांनी २४४ शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार करून १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला.

तपासादरम्यान ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासन अधिकारी रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि शासनाच्या फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बुधवारी एसआयटीने या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असताना न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

नस्ती नसलेल्या शिक्षकांना द्यावे लागणार पुरावे

बोगस शालार्थ आयडी प्रकरणात राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अंतरिम अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. आता या अहवालाच्या आधारे कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. राज्यातील ज्या शिक्षकांच्या नस्ती नाहीत, त्या सर्वच शिक्षकांची या प्रकरणात चौकशी होणार आहे.

अशा शिक्षकांना त्यांच्या नियुक्तीचे मूळ पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात येतील. त्याबाबतची पत्रे तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नस्ती नसलेल्या शिक्षकांच्या विभागवार चौकशीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. या चौकशीतून शिक्षकांची नियुक्ती खरी की खोटी याची पडताळणी केली जाणार आहे. या चौकशीत जे शिक्षक पुरावे सादर करू शकणार नाहीत, त्यांची प्रकरणे तपासासाठी थेट एसआयटीकडेच पाठवली जाणार आहेत.

राज्यभरातील अधिकारी, संस्थाचालक रडारवर

बोगस शालार्थ आयडी घोटाळा हा फक्त नागपूर पुरताच मर्यादित नसून या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरलेली असल्याचे तपासात समोर आल्यामुळे नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी राज्यभरातील अशा प्रकरणाची चौकशी करणार आहे. या घोटाळ्याची व्याप्ती २ ते ३ हजार कोटींपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच व्यक्त केला आहे. राज्यभरातील अशा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी झा यांच्या एसआयटीला आणखी मनुष्यबळ तसेच पोलिस अधिकाऱ्यांची गरज पडल्यास आवश्यकतेनुसार त्यांचा समावेश करून घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

बोगस शालार्थ आयडी घोटाळा राज्यव्याप्ती असल्याने आणि त्याची पाळेमुळे खोलवर रूजलेली असल्यामुळे या घोटाळ्याच्या तपासातील प्रगतीचा अहवाल नियमित सादर करण्याचे आदेश एसआयटीला देण्यात आले आहेत. त्यामुळे या घोटाळ्यात आता राज्यभरातील किती शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि संस्थाचालक तुरुंगाची हवा खातात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!