आदिवासी विकास विभागातील विविध ६०२ रिक्त पदांची भरती प्रक्रिया तूर्तास स्थगित


मुंबई:  मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) हा संवर्ग तयार करून आरक्षण देण्यात आल्यामुळे आदिवासी विकास विभागातील विविध ६०२ रिक्त पदांची भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या स्तरावरून २३ नोव्हेंबर २०२३ रोजी आदिवासी विकास विभागामधील ६०२ विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार २३ नोव्हेंबर  ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते.

या विविध पदांकरीता उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत तथापि २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक-१६,  दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार पुनःश्च बिंदूनामावली अद्ययावत करून गट-क संवर्गासाठी पुनःश्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत सरकारकडून सूचना करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे आदिवासी विकास विभागाची २३ नोव्हेंबर २०२३ रोजी दिलेली जाहिरात तूर्तास स्थगित करण्यात येत आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांनी याबाबतची नोंद घ्यावी. आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनःश्च बिंदूनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. बिंदूनामावली अद्ययावत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळवण्यात येईल, असे आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी कळवले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!