शिवाजी महाराज एकच छत्रपती, बाकी सर्व रयत; महाराजांच्या वंशजांनी नावापुढे ‘छत्रपती’ लावू नयेः रावसाहेब कसबे


अमळनेरः छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे छत्रपती होते. ते एकच छत्रपती राजे होते. बाकी सर्व रयत आहेत. त्यामुळे आता महाराजांच्या वंशजांनी आपल्या नावापुढे ‘छत्रपती’ लावण्याची गरज नाही, असे प्रसिद्ध लेखक, विचारवंत रावसाहेब कसबे यांनी म्हटले होते. शरद पवारांनी एका स्वयंघोषित ‘छत्रपती’चा माज चांगलाच उतरवला आहे. कदाचित हे पुन्हाही उतरवतील. त्यांनी स्वतःला रयत समजले पाहिजे, असेही कसबे म्हणाले.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे शुक्रवारी राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या वतीने आयोजित अधिवेशनात कसबे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

शरद पवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र साहित्याची समिती तयार केली होती. या समितीच्या माध्यमातून बाबासाहेबांचे साहित्य जगभर गेले, तेव्हाच जगाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कळले, असेही कसबे म्हणाले.

ग्रंथ, पुस्तके वाचण्याने समाजाची उंची वाढते. सशक्त समाज उभारणीत ग्रंथ आणि पुस्तकांची भूमिका मोलाची असते, असे यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले.

 आताच्या राज्यकर्त्यांना जुन्या साहित्याची अडचण निर्माण होत आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून खोटे आणि चुकीचे साहित्य पुढे आणले जात आहे. हे चुकीचे साहित्य मोडून काढण्याची गरज आहे, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!