अशोक चव्हाणांच्या हाती अखेर भाजपचा झेंडा, फडणवीस म्हणालेः त्यांना कुठल्याही पदाची अपेक्षा नाही!


मुंबईः काँग्रेसचा हात सोडून २४ तास उलटण्याच्या आतच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी करून त्यांना भाजपत प्रवेश दिला. यावेळी आशिष शेलार, गिरीश महाजन, हर्षवर्धन पाटील, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, प्रताप पाटील चिखलीकर इत्यादी नेते उपस्थित होते.

आज भारतीय जनता पक्षासाठी आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील एक अत्यंत ज्येष्ठ नेतृत्व, ज्यांनी विधानसभा-लोकसभा गाजवली, विविध मंत्रिपदे भूषवली, दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सांभाळले, असे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचे काम करायचे आहे. त्यांनी प्रवेश करताना आपल्याला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, विकासाच्या मुख्यधारेत काम करण्याची संधी द्या, असे सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!