छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीतही होणार पाडापाडी; रस्त्यांची संयुक्त मोजणी करून सीमांकन कराः जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना निर्देश


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीत धडक मोहीम राबवत अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे केल्यानंतर प्रशासनाने आता आपला मोर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपालिकांकडे वळवला आहे. जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीतील अतिक्रमित बांधकामांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका हद्दीत रस्त्यांची भूमिअभिलेख आणि नगररचना विभागामार्फत संयुक्त मोजणी करुन सीमांकन करुन घ्या,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज नगरपालिका प्रशासन शाखेची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, मुख्याधिकारी संभाजी देशमुख, बी.यू. बिघोत, पी.पी. अंभोरे, समीर शेख, कारभारी दिवेकर, ज्ञानेश्वर ठोंबरे, संतोष आगळे, सहायक आयुक्त ऋषिकेश भालेराव आदी उपस्थित होते.

बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)२.०,  नगरपालिकांमधील अनुकंपा पदभरती, विभागीय परीक्षा, घनकचरा व्यवस्थापन, शहर सौंदर्यीकरण इत्यादी मुद्यांचा आढावा घेण्यात आला.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. त्यानिमित्त वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता वेरुळकडे जाणारे रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर घृष्णेश्वर मंदिर परिसरात रस्ते मोकळे करणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांची मोजणी करुन घ्यावी. जिल्ह्यातील इतर नगरपालिकांमध्येही संयुक्त मोजणी करुन सीमांकन करुन घ्या आणि पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडा, असे निर्देश स्वामी यांनी दिले.

नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी झिरो पेंडसी करावी. नाविन्यपूर्ण जनहिताचे उपक्रम राबवावे, विकसित महाराष्ट्र २०४७ सर्व्हेक्षणात आपल्या क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढवावा. प्रत्येक नगरपालिकेने नागरिकांसाठी तक्रार निवारण दिवस निश्चित करावा. ई-ऑफिसला चालना द्यावी. याशिवाय प्रभाग रचना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!