भुवनेश्वरः पुरी रेल्वे स्थानकावरून आणण्यासाठी आलिशान गाडी पाठवली नाही म्हणून ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांच्या मुलाने राजभवनमधील अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण झालेल्या अधिकाऱ्याने हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत आणि पोलिस ठाण्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला दाद मिळाली नाही. त्यामुळे पीडित अधिकाऱ्याच्या पत्नीने राजभवनाबाहेर आंदोलन केले.
ओडिशाच्या राजभवन सचिवालयाच्या घरगुती विभागातील सहायक विभाग अधिकारी वैकुंठ प्रधान असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पुरी येथील राजभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आगमन होणार होते. त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली होती.
वैकुंठ प्रधान यांनी राज्यपालांचे सचिव शाश्वत मिश्रा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. राज्यपाल रघुवर दास यांचा मुलगा ललितकुमार आणि त्यांच्या खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांसह अन्य पाच जणांनी पुरीच्या राजभवनात आपल्यावर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली, असे या तक्रारीत म्हटले आहे. ही घटना ७ जुलैच्या रात्री घडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
माझी मूळ पोस्टिंग भुवनेश्वर येथील राजभवनात असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राजभवनात येणार असल्यामुळे सर्व व्यवस्था पाहण्यासाठी ५ जुलैपासून पुरीच्या राजभवनात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. ७ आणि ८ जुलै रोजी राष्ट्रपतींचा दौरा झाला. ७ जुलैच्या रात्री ११.४५ वाजता मी माझ्या कार्यालयात बसलो असताना राज्यपालांच्या खासगी स्वंयपाक्याने येऊन मला सांगितले की, ललितकुमार यांना तुम्हाला तत्काळ भेटायचे आहे., असेही या तक्रारीत म्हटले आहे.
वैकुंठ प्रधान यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ललितकुमार यांनी मला पाहता क्षणीच असांसदीय आणि अर्वाच्च भाषेत मला शिविगाळ करण्यास सुरूवात केली. मी त्यांना अशी भाषा वापरण्यास विरोध केल्यानंतर त्यांनी माझ्या कानशिलात लगावली.
ललित कुमारने माझ्या कानशिलात लगावल्यानंतर मी त्या खोलीतून तत्काळ पळालो आणि ऍनेक्सीच्या मागे लपून बसलो. परंतु ललित कुमार यांच्या खासगी सुरक्षा अधिकाऱ्याने मला शोधून काढले आणि लिफ्टद्वारे मला एका खोलीत घेऊन गेले.
तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी ही घटना पाहिली. ललित कुमार यांनी मला पुन्हा थापड मारली, माझ्या तोंडावर ठोसे मारले. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागावर लाथा मारल्या. सर्वांनी मिळून मला बेदम मारहाण केली. तुझा खून केला तरी तुला कोणीही वाचवायला येऊ शकणार नाही, असे ललित कुमार वारंवार म्हणत होता, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
८ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता राज्यपालांच्या प्रधान सचिवांकडे आपण या घटनेची तोंडी तक्रार केली आणि १० जुलै रोजी लेखी तक्रार केली, असे प्रधान म्हणाले. ११ जुलै रोजी फिर्याद देण्यासाठी आम्ही पोलिस ठाण्यातही गेलो होतो, मात्र आमची फिर्याद घेण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही पोस्टाने पोलिसांना फिर्याद पाठवली, असे प्रधान यांच्या पत्नी सयोज यांनी भुवनेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.
पुरी रेल्वे स्टेशनवर ललित कुमारला घेण्यासाठी दोन आलिशान गाड्या न पाठवल्यामुळे ललित कुमार हा वैकुंठ प्रधान यांच्यावर संतापला होता. मारहाण करताना ललित कुमारने वैकुंठ प्रधान यांना त्यांचे बूट चाटायला लावले, असा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या प्रतिनिधीने पुरीचे पोलिस अधीक्षक पिनाक मिश्रा यांना कॉल केला, परंतु त्यांनी कॉलला प्रतिसाद दिला नाही.
माझ्या पतीला राष्ट्रपतींच्या ड्युटीसाठी तैनात करण्यात आले होते. राज्यपालांच्या मुलांची सेवा करण्यासाठी नाही, असे वैकुंठ प्रधान यांच्या पत्नी सयोज यांनी म्हटले आहे. वैकुंठ प्रधान यांनी १० जुलै रोजी राज्यपाल रघुवर दास आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. परंतु त्यांनाच वर्तन सुधारण्यास सांगण्यात आले, असा दावाही सयोज प्रधान यांनी केला आहे.