संभाजीनगरची महिला पाकिस्तानी तरूणासोबत पळाली, नऊ महिन्यांनी परतली; पण दहशतवाद्यांशी संबंधाचा मेल आला आणि….


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  शहरातील सिडको परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची पत्नी तिच्या पतीला सोडून पाकिस्तानी तरूणाबरोबर सौदी अरेबियाला पळून गेली. तब्बल नऊ महिन्यांनंतर ही विवाहिता छत्रपती संभाजीनगरात परतली खरी, परंतु ती परतल्यानंतर तिचा दहशतवादी संघटनांसोबत संपर्क आला असून ती देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा ईमेल पोलिसांना मिळाल्यामुळे जिल्ह्यातील गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ही विवाहित महिला आणि तिच्या कुटुंबियांची आता दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) कसून तपासणी केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची ३४ वर्षीय पत्नी तिच्या वडिलांसोबत २०२२ मध्ये सौदी अरेबियाला गेली होती. तेथे तिची ओळख एका पाकिस्तानी तरूणाशी झाली. वडिलांसोबत भारतात परत आल्यानंतरही ही विवाहिता त्या पाकिस्तानी तरूणाच्या संपर्कात होती. त्याच्याशी जवळीक वाढल्यानंतर ही विवाहित महिला नऊ महिन्यांपूर्वी म्हणजेच डिसेंबर २०२२ मध्ये देश सोडून त्या पाकिस्तानी ब्रॉयफ्रेंडसोबत सौदी अरेबियाला पळून गेली. ३ ऑगस्ट रोजी ती छत्रपती संभाजीनगरात परत आली. ही विवाहिता पळून गेल्यानंतर तिच्या पतीने सिडको पोलिसांत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार २३ डिसेंबर २०२२ रोजी दिली होती.

सिडको परिसरात राहणाऱ्या या व्यावसायिकाचे मूळ गाव मालेगाव आहे. २०११ मध्ये या व्यावसायिकाच्या या महिलेसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर दोघे पती-पत्नी गुण्यागोविंदाने नांदत होते. या पती-पत्नीचा शहरात एक पेट्रोलपंपही आहे. परंतु ही विवाहिता वडिलांसोबत सौदी अरेबियाला गेल्यानंतर तेथे ती पाकिस्तानी तरूणाच्या संपर्कात आली आणि ती त्याच्या प्रेमात पडून आंधळी झाली. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये ती तिच्या पाकिस्तानी बॉयफ्रेंडकडे भारत सोडून पळून गेली.

पाकिस्तानी बॉयफ्रेंडकडे पळून गेलेल्या या विवाहितेने जानेवारी २०२३ मध्ये स्वतःच छत्रपती संभाजीनगरमध्ये रहात असलेल्या पतीला पोन केला. मी पाकिस्तानी तरूणासोबत लग्न केले असून तो मला माझ्या करिअरसाठी मदत करणार असल्याची माहिती या विवाहितेने तिच्या छत्रपती संभाजीनगरच्या पतीला दिली. तिने दोघांचे छायाचित्रही त्याला पाठवून दिले. ही विवाहिता काही महिने सौदी अरेबियासह लिबियामध्येही वास्तव्यास होती.

पाकिस्तानी तरूणासोबत पळालेली ही विवाहिता ३ ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळावर परतली. मुंबईत परतल्यानंतर तिने पतीकडे जाण्याऐवजी आईवडिलांकडे जाणे पसंत केले. ही महिला भारतात परतल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना या महिलेच्या बाबतीत एक ईमेल प्राप्त झाला.

या महिलेचा दहशतवादी संघटनांशी संपर्क आला असून ती देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय हा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने व्यक्त केला आहे. हा ईमेल प्राप्त होताच छत्रपती संभाजीनगरची पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून एटीएसकडून ही महिला आणि तिच्या कुटुंबियांची कसून चौकशी सुरू आहे.

हा ईमेल त्या महिलेच्या कथित पतीनेच पाठवला असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक पोलि, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीआयएसएफ आणि नागरी विमान वाहतूक महासंचालकांनाही या ईमेल पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येते. गुप्तचर यंत्रणा आणि एटीएस आता तिची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कॉल रेकॉर्डसह कसून तपास करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *