राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे, बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात बबन गिते; शरद पवारांची मोठी खेळी


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या नेतृत्वातील एका गटाने वेगळी भूमिका घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णय घेतल्यामुळे झालेली पडझड रोखून नव्याने पक्षबांधणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संघटनात्मक फेरबदल केले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत रोहिणी खडसे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. रोहिणी खडसे या माजी मंत्री आणि विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान संचालक आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या १८०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मला महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली आहे. त्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. फौजिया खान यांची आभारी आहे. महाराष्ट्रात महिलांचे संघटन वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे रोहिणी खडसे यांनी या नियुक्तीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तुम्हाला प्रदेशाध्यक्षपद दिल्यामुळे विद्या चव्हाण नाराज आहेत का? असा प्रश्न विचारल्यावर रोहिणी खडसे म्हणाल्या की, विद्या चव्हाण नाराज नाहीत. त्यांच्याच उपस्थितीत मला पत्र देण्यात आले आहे. विद्या चव्हाण यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखालीच मी काम करणार आहे.

 बीडमध्ये धनंजय मुंडेंना टक्कर देण्यासाठी बबन गिते

शरद पवार यांनी बीडमध्ये अजित पवारांसोबत गेलेले धनंजय मुंडे यांना टक्कर देण्यासाठी बबन गिते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर बीडच्या सुशीला मोराळे यांची महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुशीला मोराळे या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

बबन गिते यांनी बीडमध्ये नुकत्याच झालेल्या शरद पवारांच्या सभेत धनंजय मुंडेंची साथ सोडून आपण शरद पवारांसोबतच असल्याचे ठामपणे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे शरद पवारांनी बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात आता बबन गितेसारखा नेता उभा केला आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात आगामी काळात रंगत आलेली पहायला मिळण्याची शक्यता आहे. बबन गिते यांचा परळीत चांगलाच दबदबा आहे.

पक्षबांधणीवर जोर, पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्रे

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि निरीक्षकांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.  राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांकडून पक्षावर दावा करण्यात आला आहे. दोन्ही गटांकडून पक्षात फूट नसल्याचे सांगितले जात असले तरी कायदेशीर लढाईसाठी तयारीही केली जात आहे. दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्रे लिहून घेतली जात आहेत. ही शपथपत्रे आवश्यकता पडल्यास निवडणूक आयोगाकडे सादर केली जाण्याची शक्यता आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!