आता ‘सरसकट’ मुला-मुलींच्या नावापुढे लागणार आईचे नाव, महाराष्ट्राच्या नवीन महिला धोरणात तरतूद!


मुंबई: महाराष्ट्रात आता मुलगा असो की मुलगी, त्यांच्या नावापुढे ‘सरसकट’ आईचे नाव लावले जाणार आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच नवीन महिला धोरण जाहीर करणार असून या नव्या धोरणात तशी तरतूदच करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील काही समतावादी कुटुंबांकडून आपली मुले-मुली शाळेत घालताना त्यांच्या नावापुढे आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव आणि मग आडनाव लावण्याचा आग्रह धरला जातो. पण तशी तरतूद किंवा कॉलमच नसल्याचे सांगत शाळांकडून अनेकदा त्यांचा आग्रह मोडित काढण्यात येतो, परंतु आता नवीन महिला धोरणातच तशी कायदेशीर तरतूद करण्यात आल्यामुळे मुलामुलींच्या नावापुढे ‘सरसकट’ आईचे नाव लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

राज्य सरकारने मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात नवीन महिला धोरण आणले आहे. आतापर्यंत मुल जन्माला आल्यानंतर मुलाचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असे असायचे. अजित अनंतराव पवार असे नाव दिले जायचे. पण आता नवीन निर्णय घेतला आहे.

यापुढे मुलगा असो की मुलगी, त्यांच्या नावापुढे आधी आईचे नाव, मग वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव असणार आहे. शेवटी महिलाही समाजातील अत्यंत महत्वाचा घटक आहेत. त्यामुळे यापुढे आईचे नाव लागेल, असे पवार म्हणाले.

अर्थमंत्री या नात्याने महिलांसाठी काही निर्णय घेतले आहेत. सदनिका म्हणजेच फ्लॅट खरेदीवर महिलांसाठी एक टक्का सूट दिली आहे. महिलांच्या नावे फ्लॅट खरेदीचा व्यवहार होणार असेल तर ५ टक्के आणि पुरूषांच्या नावे व्यवहार होणार असेल तर ६ टक्के कर द्यावा लागेल. महिलेच्या नावाने ५० लाखांचे घर घेतले तर कुटुंबाचे ५० हजार रुपये वाचतील. त्यामुळे पतीराज जर नवीन घर घेणार असतील तर ते माझ्याच नावाने घ्या, असा आग्रह महिलांनी धरायला हवा, असे पवार म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!