पक्ष वाढवायचा की मोदी घालवायचा? प्रकाश आंबेडकरांचा ‘इंडिया’ आघाडीला सवाल, म्हणाले…जिंका किंवा जेल जाण्याची तयारी ठेवा!


नागपूरः पक्ष वाढवण्याची ही वेळ नाही. दोन-चार जागा कमी मिळाल्या तरी चालतील, अशी भूमिका घेण्याची ही वेळ आहे. पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला केला आहे. लोकसभेला जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा, अन्यथा पुन्हा मोदी निवडून आल्यास तिहार तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असा निर्वाणीचा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांना दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर मनुस्मृती दहन दिनानिमित्त स्त्रीमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा सामना करण्यासाठी देशातील विविध विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली आहे. परंतु त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही ठरलेला नाही. तोच धागा पकडून प्रकाश आंबेडकर यांनी गर्भित इशारा दिला आहे.

कोणी म्हणतेय मी २३ जागा लढवेन. कोणी म्हणतेय अमुक जागा लढवेन. आम्ही त्यांना म्हणतोय जागांचे सोडा. पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे? हे आधी निश्चित करा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मोदी घालवायचा असेल तर दोन-चार जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असली पाहिजे. नाही तर आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, या भूमिकेवर आडून राहिलात तर मोदी पुन्हा तुमच्या बोकांडीवर बसल्याशिवाय राहणार नाही, अन् तुम्ही तिहार तुरूंगात गेल्याशिवाय राहणार नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जास्तीत जास्त जागा जिंका किंवा तुरुंगात जा

सध्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. आम्हाला इतक्या जागा हव्या, तितक्या जागा हव्या अशा चर्चा घडवण्यात येत आहेत. परंतु पक्ष वाढवण्याची ही वेळ नाही. त्यावर चर्चा करण्याऐवजी मोदींची सत्ता कशी जाईल, यासाठी एकत्र येऊन प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे फालतू चर्चा बंद करून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील यासाठी प्रयत्न करा. अन्यथा मोदी पुन्हा निवडून आल्यास तिहार तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असे आंबेडकर म्हणाले.

मनुवादी व्यवस्था पुन्हा नको हाच अजेंडा

देशात मनुवादी व्यवस्था पुन्हा येऊ द्यायची नसेल तर संसदेवर आपल्या विचारांचा ताबा मिळवणे आवश्यक आहे. मनुची व्यवस्था अन्यायकारक आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याविरोधात लढा उभारणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात जर फुले-शाहू-आंबेडकरवाद ही विचारसरणी लोकसभेत पोहोचवायची असेल तर निवडणूक जिंकण्यासाठी खूणगाठ बांधा, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रसंगी मत विकत घ्या, पण जिंका!

वंचितच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी इतर कोणत्याही गोष्टीचा फारसा विचार न करता लोकसभा निवडणुकीत विजय कसा मिळवता येईल, याचाच विचार करावा. मोदीला संपवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने ५०० मतदार गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. यासाठी कुणाशी मैत्री करावी लागेल, प्रसंगी मत विकत घ्यावे लागले तरी ते घ्या, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला.

एकत्र या, जिंकण्याचा भेजा आम्ही देऊ

मोदीला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी इंडियाची स्थापना केली. मात्र अजूनही ते पूर्णपणे एकत्र आलेले नाहीत. मी यापूर्वीही म्हटले आहे की, मोदीला घालवायचे असेल तर आधी एकत्र या. कसे लढायचे यासाठी आम्ही आमचा भेजा देतो. आम्ही त्यांना सर्वप्रकारची मदत करायला तयार आहोत. मात्र हे लोक आम्हालाच नुकसान पोहोचवत आहेत. मोदीला पुन्हा देशावर राज्य करू द्यायचे नसेल तर एकत्र येणे, संघटित होऊन लढणे हाच एकमेव उपाय आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मोहन भागवतांनी तरी उत्तर द्यावे

प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएसचे मुख्यालय असलेल्या भूमीत जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांनाही सवाल केले. मोदी आमच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. किमान मोहन भागवत तरी देतील अशी अपेक्षा करतो. पुलवामा हल्ल्यात भारताच्या सैनिकांनी जीव गमावला. साधारणतः सैनिकांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने नसतात. मात्र पुलवामान घटनेदरम्यान ८० वाहनांचा ताफा होता. सैनिकांच्या सुरक्षेसाठी दहा वाहनांपर्यंत रेंज असणारी शस्त्रे असतात. मात्र पुलवामा दरम्यान हे शस्त्र नव्हते. मोदी याबाबत उत्तर द्यायला तयार नाहीत. किमान मोहन भागवत यांनी तरी या गोष्टीचा खुलासा करावा, असे आंबेडकर म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!