टी-२० वर्ल्ड कपः भारताचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, विराट कोहलीने पाकच्या खिशातून खेचून आणली विजयश्री!


मेलबर्नः टी-२० विश्वचषक क्रिकेटमध्ये आज भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या अटीतटीच्या आणि रोमांचक महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करून वर्ल्ड कपची दमदार सुरूवात केली. विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. विराटने सुरूवातीच्या धक्क्यांनंतर लडखडू लागलेल्या भारतीय संघाला सावरले आणि शेवटपर्यंत तो नाबाद राहिला. विराटने आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि आवश्यक असलेला रनरेट कायम राखला. विराट कोहलीने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा ठोकल्या. विराटच्या या शानदार खेळीमुळे पाकिस्तानच्या खिशातून विजयश्री खेचून आणली. आयसीसीनेही विराटचे कौतुक केले आहे. ‘किंग परतला! सलाम विराट कोहली!’  असे ट्विट करून आसीसीने विराटला सलाम ठोकला आहे.

 तत्पूर्वी नाणेफेक जिंकून भारताने पाकिस्तानला आधी फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. पाकिस्तानचा संघ २० षटकात ८ विकेट गमावून १५९ धावा काढू शकला. पाकिस्तानच्या या खेळीत शान मसूद आणि इफ्तिखार अहमद यांच्या अर्धशतकाचे महत्वाचे योगदान राहिले. शाहीन आफरीदी आणि हारिस रऊफच्या वेगवान फलंदाजीने पाकिस्तानला इथपर्यंत पोहोचण्यास मदत केली.

विजयासाठी भारतापुढे १६० धावांचे लक्ष्य होते. परंतु भारताची सुरूवात अत्यंत सुमार राहिली. जेव्हा एकूण धावसंख्या ७ होती, तेव्हाच भारताला एल. राहुलच्या रुपाने पहिला झटका बसला. एकूण धावसंख्या १० असताना रोहित शर्माच्या रुपाने भारताला दुसरा झटका बसला. एकूण २६ धावांवर सूर्यकुमारच्या रुपाने तिसरी आणि ३१ धावसंख्येवर अक्षर पटेलच्या रुपाने भारताची चौथी विकेट पडली. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाला सावरले.

 हार्दिक पांड्यासोबत भागीदारी करत विराट कोहलीने ४३ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताला त्यावेळी विजयासाठी उर्वरित १७ चेंडूत ४४ धावांची आवश्यकता होती. या महामुकाबल्यात पाकिस्तान बाजी मारणार असे वाटू लागले होते. परंतु विराट कोहलीची प्रतिभा आणि आत्मविश्वासाने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी युगानु युगांसाठी एक लक्षणीय उदाहरण घालून दिले. विराट कोहलीने पुढील १० चेंडूत ३२ धावा ठोकून विजयश्री भारताच्या झोळीत टाकली.

विराट कोहलीला त्यामुळे सामनावीर घोषित करण्यात आले. भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर खळबळजनक विजय मिळवत टी-२० विश्वचषक क्रिकेटची अविस्मरणीय आणि दमदार सुरूवात केली. या विजयाबरोबरच भारतीय संघ आणि विराट कोहलीवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!