साताराः उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जादूटोणा केला आहे. ते शरद पवारांकडे गेले होते. शरद पवारांच्या तावडीत सापडलेला सुटत नाही. जादूटोणा करणारा बाबा देशाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे, असे वादग्रस्त आणि बेछूट वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. ते सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे हे सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे. त्यात ते अडकले. त्यामुळेच ते त्यांच्यासोबत आहेत. या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासारखाच विचार करू लागले आहेत. या पक्षातील भोंदूबाबाच्या ताब्यात कोणी आले तर तो सुटत नाही. भोंदूबाबा कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ते पुन्हा सांगण्याची गरज नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादीचे घड्याळ बारामतीमध्ये बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. बारामती शहराचा विकास म्हणजे संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास नाही. अजितदादा नेमके काय करतील हे कोणालाच कळणार नाही. ते त्यांनाच माहीत असते, असेही बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता सत्तेचे स्वप्न सोडून द्यावे. त्यांना अजूनही सत्तेत येऊ असे वाटत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बेईमानी करून सत्ता स्थापण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आजही ते स्वप्नात असतील. त्यांना सत्ता गेल्यासारखे वाटतच नसेल. पण जयंतराव महाराष्ट्रात तुमची सत्ता कधीच येणार नाही. आम्ही दोनशेपेक्षा अधिक जागा आणणार आहोत, असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
दरम्यान, बावनकुळे यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे महाराष्ट्रातून तीव्र स्वरुपाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. बावनकुळेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र शब्दांत धिक्कार केला आहे.
‘बावनकुळेच थाळ्या वाजवणाऱ्या भोंदूबाबाच्या संपर्कात’: बावनकुळे हेच थाळ्या वाजवणाऱ्या भोंदूबाबाच्या संपर्कात आहेत. बावनकुळेंचे विधान म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहे. दाढी वाढवलेले भोंदूबाबा टाळ्या, थाळ्या वाजवायला सांगतात. त्यामुळे भोंदूबाबा कोण आहेत हे जनतेला माहीत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बावनकुळेंच्या टिकेचा समाचार घेतला आहे.
‘हे जादूटोणाविरोधी कायद्यालाच आव्हान’: अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा ज्यांच्यामुळे संमत झाला, त्या डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या साताऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्षांची जादूटोण्याची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणि महाराष्ट्राचा व या कायद्याचा अवमान करणारी आहे. शिवाय जादूटोणाविरोधी कायद्यालाच हे आव्हान असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
‘तुमचे कर्तृत्व काय याचा आधी विचार करा’: शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष वेधून घेणे हे आता भाजप नेत्याचे काम बनले आहे. याचा अर्थ ते स्वतःच्या कामावर उभे नाहीत. त्यांना आमच्यावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवायची असेल, तर त्यांनी हे थांबवायला हवे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी आपले कर्तृत्व काय आहे, याचा विचार करावा. तुम्ही अशी विधाने केली तर मग आम्ही आहोतच, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.