आता वर्षातून चारवेळा मतदार नोंदणी, छायाचित्रासह प्रारूप मतदार यादी ९ नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध


मुंबई:  सर्वसाधारणपणे मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती. आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार म्हणून नोंदणी करता येईल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यानुसार ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असून ही मतदार यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकनार्थ उपलब्ध असेल, यासंदर्भात दावे व हरकती दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील तर दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी  मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाईल.

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार  १ जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी आणि एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी तयार करणे, ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे. तसेच ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे. त्याचप्रमाणे, दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिव्यांग व महिलांसाठी आणि दि.२६ व २७ नोव्हेंबर, २०२२ रोजी तृतीयपंथी व देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

या कालावधीत दिनांक १ जानेवारी २०२३  रोजी १८ वर्ष वय पूर्ण होत असलेल्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार असून ज्या नागरिकांचे दि. १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत १८ वर्ष वय पूर्ण होणार आहे, ते पण नवीन मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज करु शकतील, असे जिल्हाधिकारी निवतकर यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भातील दावे व हरकती असल्यास त्या  दिनांक २६ डिसेंबर २०२२ पर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत आणि यानंतर दि. ५ जानेवारी, २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाईल.

या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मुंबई शहर जिल्हयातील नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी आणि यासंदर्भात काही दावे व हरकती असल्यास  त्या सुद्धा कळवाव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी निवतकर यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!