डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे आणि बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे उद्या होणार उद्घाटन


मुंबई:  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्ताने २६ नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चेंबूरच्या दि फाईन आर्टस् सोसायटी येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौध्द लेण्यांवर आधारित टूर सर्कीट दि. ३, ४, ७ व ८ डिसेंबर रोजी आयोजित केले असून या टूरमध्ये चैत्यभूमी, राजगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा या स्थळांचा समावेश आहे. हा उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पर्यटकांसाठी भविष्यात उपलब्ध करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून तसेच परराज्यातून चैत्यभूमी दादर येथे मोठ्या संख्येने अनुयायी आणि पर्यटक, अभिवा‍‌दन करण्यासाठी दरवर्षी भेट देत असतात. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे तसेच बौद्ध लेणी यांचे दर्शन घडविण्यासाठी  हा सर्कीट बनवण्यात आला आहे, असेही लोढा म्हणाले.

पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले “पर्यटन संचालनालयाद्वारे व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथे स्टॉल उभारुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटची माहिती देण्यात येणार आहे. हे सर्कीट पर्यटन संचालनालय, मुंबई टूर गाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क व महाराष्ट्रामधील मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सहा जिल्ह्यात पर्यटकांसाठी राबवण्यात येणार आहे.

‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ च्या उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण दादर येथील चैत्यभूमी, महाड येथील चवदारतळे, नाशिक येथील काळाराम मंदिर व नागपूर येथील दीक्षाभूमी येथे करण्यात येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!