सोलापूर/पंढरपूरः वाराणसृ तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिक पातळीवर जोरदार विरोध होत असून सर्व पक्षीय आंदोलन सुरू आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही सामूहिक राजीनाम्याचाही इशाराही दिलेला असतानाच काहीही झाले तरी पंढरपूर कॉरिडॉर होणारच, या भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम आहेत. याच मुद्यावर भाजपचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत ‘ मी आव्हान देऊन सांगतो की नाही होणार… आणि तो (देवेंद्र फडणवीस) जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही,’ अशा शब्दांत फटकेबाजी केली.
वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर विकसित करण्याची शिंदे-फडणवीस सरकारची योजना आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आराखडाही तयार केला आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिक पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध आहे. त्यासाठी आंदोलनही सुरू आहे. हा कॉरिडॉर रद्द झाला नाही तर सामूहिक राजीनामे देऊ, असा इशारा स्थानिक भाजप नेत्यांनी दिला आहे. या कॉरिडॉरमुद्द्यावर पंढरपूर कर्नाटकला जोडण्याचा आणि पुढच्या वर्षी आषाढीला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेला निमंत्रित करण्याची भाषाही बोलत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र काहीही झाले तरी हा कॉरिडॉर होणारच असे सांगत आहेत.
या पार्श्वभूमीवर काही नेत्यांनी आज मुंबईत जाऊन भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची भेट घेतली आणि या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यामुळे स्वामी यांनी आज पंढरपूरला भेट देऊन स्थानिक नेत्यांशी चर्चा केली.
या दौऱ्यावर असतानाच टीव्ही९ मराठीने सुब्रह्मण्यम स्वामींशी खास बातचित केली. देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की पंढरपूर कॉरिडॉर होणारच. कोणीही मध्ये आले तरी पंढरपूर कॉरिडॉर होणारच, असे ते म्हणत आहेत, असे सांगत पत्रकाराने सुब्रह्मण्यम स्वामींना प्रश्न विचारला असता, ‘मी आव्हान देऊन सांगतो की नाही होणार आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही,’ असे स्वामी म्हणाले. स्थानिक नेत्यांप्रमाणेच स्वामी यांनीही पंढरपूर कॉरिडॉरला विरोध केला आणि कॉरिडॉरऐवजी पंढरपूरमधील इतर कामांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका मांडली.
त्याची (कॉरिडॉरची) काय घाई झाली आहे हेच कळत नाही. त्याऐवजी चंद्रभागा नदी स्वच्छ करा. येथे एखादे विमानतळ बांधा. या ठिकाणी किती लोकांना यायचे असते. महाआरतीमध्ये सहभागी व्हायचे असते. त्यांना धूळ मातीमध्ये यावे लागते. ही कामे आधी करा. कॉरिडॉरसाठी येथील मंदिरे, दुकाने तोडण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार जे करत आहे ते योग्य नाही, असेही स्वामी म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकार अनैतिकः स्वामी यांनी नंतर माध्यमांशीही संवाद साधला. महाराष्ट्रात स्थापन झालेले शिंदे- फडणवीस सरकार अनैतिक आहे. हे सरकार शिवसेना पक्ष तोडून बनवण्यात आले आहे. शिंदे- फडणवीस सरकार जनतेमधून निवडून आलेले नाही. हे सरकार अनैतिक आहे. त्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असे सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले.
मोदी हिंदुत्ववादी नाहीतः मंदिरे सरकारमुक्त करण्याबाबत प्रधानमंत्री मोदींची भेट घेणार का? असे विचारले असता मोदी हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंडमधील अनेक मंदिरे ताब्यात घेतली आहेत. न्यायालयात जाऊन मी ती मुक्त करणार आहे. ज्यांना असे वाटते की मोदी चांगले काम करत आहेत, ते सर्व मोदींचेच चमचे आहेत, असेही स्वामी म्हणाले.