सुनिल तटकरेंना आठवली ‘जात’, म्हणाले मी शुद्र असल्यामुळेच सुप्रिया सुळेंकडून केले जातेय लक्ष्य!


नागपूरः राजकीय नेत्यांचे प्रसंगावधान आणि योग्यवेळी योग्य पत्ता खेळण्याची हातोटी हा कायम औत्सुक्याचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या छत्रछायेखाली चारवेळा कॅबिनेट मंत्री, एक वेळा राज्यमंत्री आणि एकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद उपभोगून झालेल्या आणि सध्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनिल तटकरेंना अखेर त्यांची ‘जात’ आठवली. आपण शुद्र असल्यामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.

‘घड्याळ तेच वेळ नवी’ असे घोषवाक्य घेऊन अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे आजपासून (५ नोव्हेंबर) राज्यव्यापी दौऱ्यावर निघाले आहेत. नागपुरातून त्यांच्या दौऱ्याचा प्रारंभ झाला आहे. नागपुरात पक्षाच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना तटकरेंना पहिल्यांदाच त्यांची जात आठवली आणि ते शुद्र असल्याचा ‘साक्षात्कार’ही झाला.

सुप्रिया सुळे माझा ‘महासंसदरत्न’ असा उल्लेख का करतात मला माहीत. मी ज्या समाजातून आलो किंवा कदाचित मी शुद्र असल्यामुळे त्या मला लक्ष्य करत असाव्यात, असे तटकरे म्हणाले.

 सुप्रिया सुळे माझ्यावर गेल्या काही दिवसांपासून सॉफ्ट टार्गेट म्हणून टीका करत असतील. ‘एखादा व्यक्ती’  असा माझ्याबाबत उल्लेख करणे भूषणावह नाही. त्यांचा काय राग आहे हे मला माहीत नाही, असे तटकरे म्हणाले.

दिल्लीत सुनावणी असताना संताप अनावर झाला. कोणी काय चॅट केले, मला माहीत आहे. माझी नियत साफ आहे. अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केले. मात्र मी शुद्र असल्यामुळे कदाचित त्या माझा राग करत असतील. मात्र आता त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद देत नाही, असेही तटकरे म्हणाले.

 कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसले असताना अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. त्यानंतर मतभेद होऊन सत्तांतर झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत असून मराठा समाजाला महायुती सरकार आरक्षण देईल, असेही तटकरे म्हणाले.

कोण आहेत सुनिल तटकरे?

रस्त्याच्या कामांची कंत्राटे घेणारे सुनिल दत्तात्रय तटकरे यांनी १९८४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवारांना आपला नेता माणून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. १९९५ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले. १९९९ मध्ये त्यांचा विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये  नगविकास राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला.

२००४ मध्ये त्यांना अन्न व नागरीपुरवठा खात्याचे कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले. २००८ मध्ये अशोक चव्हाण सरकारमध्ये ते पुन्हा वित्त व नियोजन खात्याचे कॅबिनेटमंत्री बनले. २०१० मध्ये पृथ्वाराज चव्हाण सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री बनले. २०१५ ते २०१८ या काळात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. २०१९ मध्ये ते रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बनले.

जातीपातीचे राजकारण फारकाळ टिकत नाही. जनतेत तेढ निर्माण करता येणार नाही. गेली पंधरा वर्षे मी विकासाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या आहेत, असे सांगणारे सुनिल तटकरे यांना नेमके आताच ते शुद्र असल्याची आठवण का झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातच त्यांनी त्यांच्या शुद्रत्वाची आठवण का काढली? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!