मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परिस्थिती वाईट होईल. या निकालानंतर ते कुठेही दिसणार नाहीत. तुम्ही शोधत रहाल, पण ते तुम्हाला सापडणार नाहीत, असा दावा प्रख्यात राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केला आहे.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, देशातील राजकीय परिस्थितीचे भाष्यकार म्हणून ओळखले जाणारे योगेंद्र यादव यांनी ‘न्यूज तक’ला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत भाष्य केले आहे. महाराष्ट्रात एनडीएला कमीत कमी २० जागांचे नुकसान होईल आणि ४ जूनच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे कुठेही दिसणार नाहीत, असे योगेंद्र यादव म्हणाले.
महाराष्ट्रातील निवडणुकीदरम्यान असली शिवसेना आणि असली राष्ट्रवादी कोणती हा खरा मुद्दा होता. ज्यावेळी पाचव्या टप्प्यांसाठी मुंबईतील मतदान पार पडले, त्यावेळी तर हे अधिकच स्पष्ट झाले. या निवडणुकीत एकनाथ शिंदे पिछाडीवर होते आणि असली राष्ट्रवादीच्या मुद्यावर शरद पवारांचा गट आघाडीवर होता, असे योगेंद्र यादव म्हणाले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप- एनडीएचे मोठे नुकसान होत आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४२ जागा मिळाल्या होत्या. पण यावेळी एनडीएला तब्बल २० जागांचे नुकसान होऊ शकते. म्हणजेच २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएचे जे काही नुकसान होईल, त्याचा थेट फायदा इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीला होईल. गेल्या वेळी ६ जागांवर मर्यादित असलेल्या विरोधी आघाडीला यावेळी २६ जागा मिळू शकतात, असे योगेंद्र यादव म्हणाले.
महाराष्ट्रात भाजपच्या ५ जागा कमी होतील. म्हणजे गेल्यावेळी भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्या कमी होऊन १८ जागा भाजपला मिळतील. तर मित्रपक्ष (एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस) लढत असलेल्या २० जागांपैकी ४ जागा निवडून येतील. याचा अर्थ त्यांना १६ जागांचा फटका बसेल, असा अंदाजही योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे.
भाजपला फक्त २३० जागा?
यावेळच्या निवडणुकीत भाजप कोणत्याही परिस्थितीत बहुमताचा आकडा गाठताना दिसत नाही. भाजपला २५० च्या आसपास जागा मिळू शकतात. जर भाजप २३० जागांपर्यंतच मर्यादित राहिली तरी आश्चर्य वाटालया नको. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या घटक पक्षांना मिळणाऱ्या जागांच्या भरवश्यावर भाजप बहुमताच्या २७२ आकड्यापर्यंत पोहोचू शकेल. परंतु याबाबत मला खात्री नाही, असेही योगेंद्र यादव म्हणाले.