विद्यापीठाच्या अधिकृत लोगोवर आरएसएसप्रणित संघटनांचा कब्जा?, खासगी कार्यक्रमांसाठी सर्रास वापर; कुलगुरू कारवाई करणार का?


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिकृत लोगोचा आरएसएसप्रणित संघटनांकडून अनधिकृतपणे सर्रासपणे वापर करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या अधिकृत लोगोवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित संघटनांनी कब्जा केला की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस-भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंच, डिफेन्स करिअर अकॅडमी आणि पडेगावच्या वामनराव पितांबरे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (३१ ऑगस्ट) ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणः स्वरुप आणि अंमलबजावणी’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेच्या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रमाचे संयोजक असलेल्या तिन्ही संस्था/ संघटनांच्या लोगोबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अधिकृत लोगोही वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात विद्यापीठाचा कोणताही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याची नोंद या निमंत्रण पत्रिकेवर नाही.

या कार्यक्रमाचे स्वरुप विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळे, प्राधिकरण, अभ्यास मंडळावरील सर्व सदस्य आणि प्राध्यापक यांच्यासाठी कार्यशाळा असे असले तरी विद्यापीठाचा या कार्यक्रमाच्या संयोजनात काडीचाही सहभाग नसेल तर आरएसएसप्रणित या खासगी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर विद्यापीठाचा अधिकृत लोगो अनधिकृतपणे वापरलाच कसा?  हा खरा प्रश्न आहे.

हा लोगो वापरण्यापूर्वी संयोजकांनी विद्यापीठ प्रशासनाची रितसर परवानगी घेतली होती का? की विद्यापीठाची सर्वच प्राधिकरणे, अधिकार मंडळे आणि अभ्यास मंडळांवर बहुतांशी आरएसएसच्याच कार्यकर्त्यांचा भरणा करण्यात आल्यामुळे विद्यापीठाचा हा लोगो आपलीच मालमत्ता आहे, असे समजून या लोगोचा सर्रासपणे वापर करण्यात येऊ लागला आहे की काय?, असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

या कार्यक्रमाच्या संयोजकांपैकी विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक सर्जेराव जिगे हे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत. डिफेन्स करिअर अकॅडमीचे संचालक डॉ. केदार रहाणे हेही राज्यपाल नामनिर्देशित अधिसभा सदस्य आहेत तर वामनराव पितांबरे महाविद्यालयाचे सर्वेसर्वा हरिनारायण जमाले हे इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत. हे तिघेही आरएसएसशी संबंधित आहेत.

विद्यापीठात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर  धडाधड गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणारे कुलगुरू डॉ. विजय फुलारी आता आपली मालमत्ता समजून अधिकार मंडळावरीलच या सदस्यांनी खासगी कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या अधिकृत लोगोचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल कारवाई करणार का? असा सवाल विचारला जात आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!