न्यूजटाऊनचे सहाव्या वर्षात पदार्पण: आव्हाने अनेक,पण  इरादा नेक!


‘Journalism Without Fear & Favor!’ म्हणजेच भयमुक्त आणि चाटुगिरीमुक्त पत्रकारितेचे ब्रीद वाक्य उराशी बाळगून ३१ ऑगस्ट २०१९ रोजी न्यूजटाऊनचा प्रारंभ झाला. गेल्या पाच वर्षांच्या वाटचालीत न्यूजटाऊनला अनेक आर्थिक आणि विशेषतः राजकीय आव्हानांचा सामना करावा लागला. पण त्या आव्हानांपुढे मान न तुकवता न्यूजटाऊनने आपली वाटचाल सुरूच ठेवत न्यूजटाऊन आज सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे.

न्यूजटाऊनचा ३१ ऑगस्ट रोजीच प्रारंभ करण्याचे तसे खास कारण आहे. १८७१ मध्ये ब्रिटिश सरकारने बॉम्बे प्रेसिडेन्सी कायद्यांतर्गत गुन्हेगारी जमात कायदा करून देशभरातील भटक्या आणि आदिवासी जमातींना कैदखान्यात डांबून ठेवले. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी भारत सरकारने हा कायदा रद्द केला आणि या दिवशी गुन्हेगार ठरवलेला भटका-विमुक्त समाज विशेष मुक्त झाला. हाच त्यांचा खरा स्वातंत्र्य दिन. म्हणून ३१ ऑगस्ट रोजीच न्यूजटाऊनची सुरूवात करण्याचे प्रयोजन!  उपेक्षित, दुर्लक्षित, आधारवंचित समाजाचे विविध प्रश्न, राजकारण आणि धोरण, सरकार आणि प्रशासन या मुद्यांवर लक्ष केंद्रित करून लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करून भयमुक्त समाजाची जडणघडण हा न्यूजटाऊनचा सर्वोच्च हेतू आहे.

दर्जेदार आणि उच्चप्रतीची शोधपत्रकारिता आणि व्यवस्थेला निर्भिडपणे प्रश्न करणाऱ्या पत्रकारितेवर आमचा विश्वास असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात अशा पत्रकारितेवर विश्वास न्यूजटाऊनचा विश्वास आहे. गेल्या पाच वर्षांच्या वाटचालीत हाच विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न न्यूजटाऊनने केला आहे.  गेल्या पाच वर्षांच्या काळात न्यूजटाऊनने अनेक धाडसी मोहिमा यशस्वीपणे राबवल्या. मग नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील दलित तरूणाची निर्घृण हत्या असो की धुळ्यातील सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील नेत्या आणि विचारवंत सरोज कांबळे यांचा त्यांच्याच मुलाने केली निर्दयी हत्या असो, उच्च शिक्षण विभागातील १० हजार कोटींहून जास्त रकमेचा अनुदान घोटाळा असो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आरक्षणाचा मुडदा पाडून प्राध्यापकपदी केलेल्या २८ सग्यासोयऱ्यांच्या नियुक्त्या असो, न्यूजटाऊनने सबळ पुरावे देत निर्भयपणे अशा अनेक प्रकरणांचा पर्दाफाश केला आहे. या काळात कायदेशीर नोटिसा बजावून न्यूजटाऊनचा आवाज दाबण्याचेही प्रयत्न झाले. परंतु भय आणि चाटुगिरी हे दोन शब्द न्यूजटाऊनच्या स्वभावधर्मातच नसल्यामुळे अशा प्रयत्नांना न्यूजटाऊन डगमगले तर नाहीच, उलट अशा व्यवस्थेवर अधिक जोरकसपणे तुटून पडून न्यूजटाऊनने त्यांचे बुरखे फाडले आहेत. शोधपत्रकारिताचे नवा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न न्यूजटाऊनने जाणीवपूर्वक केला आहे. त्यामुळेच अल्पावधीतच न्यूजटाऊन केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर ग्लोबल मराठी न्यूजपोर्टल बनले आहे.

भडक मथळे देऊन वाचकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा नवा पायंडाच जणू डिजिटल मीडियात पडला आहे. कुठलेही तथ्य किंवा किमान माहितीचा अभाव असतानाही सनसनाटी निर्माण केली की ती बातमी झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल होते. परंतु त्यामुळे वाचकांचे ना समाधान होते, ना त्या वाचकाचा त्या मीडियावरचा विश्वास दुणावतो! न्यूजटाऊनने प्रारंभापासूनच या ट्रेंडला फाटा दिला आहे. जोपर्यंत न्यूजटाऊनकडे वस्तुस्थितीदर्शक पुरावे हाती येत नाहीत, तोपर्यंत निष्कारण हाईप करायचा नाही, हे आमचे धोरण होते, आहे आणि यापुढेही कायम राहील, याची आज आम्ही पुनःश्च ग्वाही देतो.

शासन आणि प्रशासनाची ‘भक्ती’ करण्याचे नवे युग २०१४ पासून भारतात अवतरले आहे. यंत्रणांच्या धाकापुढे भलेभले गारद होऊन या झापडबंद भक्तीपंथाच्या मार्गाला लागलेले असताना या झापडबंद भक्तीच्या अंधकारमय युगात स्वतंत्रपणे वाटचाल करणे आणि व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणे म्हणावे तितके सोपे नाही. परंतु न्यूजटाऊन भारतीय संविधान, लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करत आपली वाटचाल करत राहील. न्यूजटाऊनचा सर्वदूर पसरलेला वाचक/हितचिंतक हेच न्यूजटाऊनचे खरे सामर्थ्य आहे. या सर्वदूर पसरलेल्या वाचकांचा विश्वास हीच न्यूजटाऊनची खरी कमाई आहे. या विश्वासाला किंचितही तडा जाणार नाही, यासाठी न्यूजटाऊन बांधील आहे, याची पुन्हा एकदा आम्ही ग्वाही देतो!

भयमुक्त आणि चाटुगिरीमुक्त पत्रकारितेसाठी आपले योगदान द्या!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!