साईनगर शिर्डी-तिरुपतीदरम्यान धावणार रेल्वेच्या १८ विशेष फेऱ्या; कधीपासून सेवा? मार्ग कोणता?, वाचा सविस्तर तपशील


मुंबईः भारतीय रेल्वेने साईनगर शिर्डी-तिरूपतीदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून ३ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत या विशेष रेल्वेच्या १८ फेऱ्या धावणार आहेत. रेल्वेच्या या विशेष फेऱ्यांमुळे दोन महत्वाची धार्मिकस्थळे जोडली जाणार असून शिर्डीचे साईबाबा आणि तिरूमला तिरूपतीचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भक्तांची मोठी सोय होणार आहे.

साईनगर शिर्डी आणि तिरुपतीदरम्यान रेल्वेच्या या विशेष साप्ताहिक फेऱ्या धावणार आहेत. ३ ऑगस्टपासून या फेऱ्या सुरू होणार आहेत. गाडी क्रमांक ०७६३७ ही विशेष रेल्वे गाडी ३ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर या काळात दररविवारी पहाटे ४ वाजता तिरूपती येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी १०.४५ वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल.

 ही गाडी ऑगस्ट महिन्यात ३, १०,१७, २४ आणि ३१ तारखेला तर सप्टेंबर महिन्यात ७, १४,२१ आणि २८ तारखेला तिरुपती-साईनगर शिर्डीदरम्यान धावेल.

गाडी क्रमांक ०७६३८ साईनगर शिर्डी-तिरूपती ही साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी ४ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर या काळात दरसोमवारी साईनगर शिर्डी येथून सायंकाळी ७.३५ वाजता सुटे आणि तिसऱ्या दिवशी बुधवारी रात्री १.३० वाजता तिरुपती येथे पोहचेल.

ही विशेष रेल्वे गाडी ऑगस्ट महिन्यात ४, ११, १८ आणि २५ तारखेला तर सप्टेंबर महिन्यात १, ८, १५, २२ आणि २९ तारखेला साईनगर शिर्डी-तिरुपतीदरम्यान धावेल.

थांबे कुठे?: या विशेष रेल्वे गाड्यांना दोन्ही बाजूंनी रेणीगुंठा गुडूर, नेल्लोर, ओंगोल, चिराळा, तेनाली, गुंटूर, सत्तेनापल्ली, पिडुगुरूल्ला, नाडीकुडे, मिऱ्यालागुडा, नालगोंडा, सिकंदराबाद, लिंगमपल्ली, विकाराबाद, झहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, सेलू, जालना, औरंगाबाद, नगरसोल, मनमाड आणि कोपरगाव येथे थांबे देण्यात आले आहेत.

गाडीची रचना कशी?: या विशेष रेल्वे गाड्यांना एसी टू टियर, एससी थ्री टियर, स्लीपर आणि द्वितीय श्रेणीचे जनरल एकूण १८ डबे असतील, असे दक्षिण मध्य रेल्वेने म्हटले आहे. साईनगर शिर्डी आणि तिरूपतीदरम्यान होणारी प्रवाशांची जास्तीची गर्दी टाळण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने या दोन धार्मिक स्थळांदरम्यान या १८ विशेष रेल्वे फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

आरक्षण कधीपासून?: साईनगर शिर्डी ते तिरुपतीदरम्यान धावणाऱ्या या विशेष रेल्वे गाडीच्या आरक्षणाची सुविधा १ ऑगस्टपासून सर्व संगणीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!