
मुंबईः बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महायुती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच ही माहिती दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यापासूनच विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपी करण्यात आल्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारव दबाव वाढवला होता. धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला नाही तर विधिमंडळ अधिवेशनात सभागृहाचे कामकाज रोखण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षाने दिला होता. त्यामुळे विरोधकांचा वाढता दबाव पाहता मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो काल व्हायरल झाले होते. त्या फोटोमुळे राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे पीए जोशी यांनी फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुपूर्द केला. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भाकीत केले होते. ते भाकीत खरे ठरले.
सरकारच बरखास्त करा
धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा पुरेसा नसल्याचे सांगत सरकारच बरखास्त करण्याची मागणी केली. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा पुरेसा नाही. राज्य सरकारच बरखास्त करण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
