
छत्रपती संभाजीनगरः केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या १८ दिवसांपासून आंदोलनाला बसलेले कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या उपस्थितीत सोमवारी छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी भरपावसातही हजारोंच्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर पत्रकारांनी अभिजीत दिपके यांना अण्णा हजारेंची भेट घेणार का? असे विचारले असता ‘म्हाताऱ्यांनी आता निवृत्त व्हावे आणि आश्रमात जाऊन विश्रांती घ्यावी,’ अशा तिखट शब्दांत त्यांनी हजारेंची ‘अण्णागिरी’ उतरवली.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार, विठ्ठल कांगणे, रविकांत तुपकर, नितेश कराळे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. विविध मागण्यांचे फलक हातात घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी हक्क आमचा लढा भविष्याचा अशा घोषणा देत विभागीय आयुक्तालयाचा परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तुम्ही अण्णा हजारेंची भेट घेणार आहात का? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर ‘ज्या लोकांचे वय ५०-६० वर्षापेक्षा जास्त झाले आहे, त्यांनी स्वतःहून सर्व सामाजिक आणि राजकीय चळवळींमधून निवृत्त झाले पाहिजे. हा प्रश्न थेट देशातील तरूण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यामुळे आमचे काय करायचे आणि आमचे भविष्य कसे घडवायचे, हे सर्वस्वी आम्हाला म्हणजेच तरूणांना ठरवू द्या. ज्या म्हाताऱ्या लोकांचे सर्वकाही झाले आहे, त्यांनी आता निवृत्त होऊन आश्रमात विश्रांती घ्यावी. त्यांनी उगाचच तरूणांच्या भवितव्याचे निर्णय घेऊ नये’ असे दिपके म्हणाले.
आपण अण्णा हजारे किंवा इतर कोणाचीही भेट घेणार नसल्याचे स्पष्ट करत अभिजीत दिपके यांनी अण्णा हजारे यांचे वय आणि नेतृत्वावरच बोट ठेवले आहे. केवळ सामाजिक काम करणाऱ्या नेत्यांनीच नाही तर राजकारणातील वयस्कर नेत्यांनी आता थांबले पाहिजे आणि देशातील तरूणांना नेतृत्व करू दिले पाहिजे, अशी भूमिकाही अभिजीत दिपके यांनी मांडली.
आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?
छत्रपती संभाजीनगरात भरपावसात हजारोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. प्रचंड पोलिस बंदोबस्तात झालेले विद्यार्थ्यांचे हे आंदोलन लक्षणीय ठरले. आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या अशाः
- स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी एमपीएससी आणि टीईटीसारख्या महत्वाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्यात.
- पेपरफुटीसारख्या गंभीर गुन्ह्यात दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असलेला कायदा तातडीने लागू करावा.
- नॉर्मलायझेशनची पद्धत रद्द करा.
- एमपीएससीकडे वर्ग केलेल्या ३ व ४ श्रेणीच्या पदांच्या भरतीचा अभ्यासक्रम जाहीर करा.
- लघुलेखक पदे पुनरूज्जीवित करून त्यावरील भरती प्रक्रिया सुरू करा.
- गट डमधील पदभरतीचे केंद्रीकरण रद्द करून भऱती प्रक्रिया कायमस्वरुपी व नियमितपणे राबवा.
- वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी एकच शुल्क आकारणी करा.
- पोलिस भरतीचे वेळापत्रक तातडीने जाहीर करा.
- भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी एक सक्षम व त्रयस्थ यंत्रणा कार्यान्वित करा.
अशा या आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या. भरपावसात हजारोंच्या संख्येने जमलेल्या या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची पोलिसांनी एवढी धास्ती घेतली होती की, सुरक्षेचा उपाय म्हणून आंदोलनस्थळी तीन पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि दीडहजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
